नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिन्याच्या सुरुवातीला निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया यांची १६ व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आता, ज्येष्ठ पत्रकार आणि ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष, माजी व्यय सचिव अजय नारायण झा, निवृत्त सनदी अधिकारी अ‍ॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष या चार नवीन सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी करण्यात आली.

माजी वित्त आणि व्यय सचिव अजय नारायण झा, जे १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य देखील होते त्यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजाध्यक्ष आणि मॅथ्यू हे देखील पूर्णवेळ सदस्य असतील तर स्टेट बँक समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे कबूल करण्यासाठी छळ; संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर आरोप

मणिपूरमधून १९८२ सालच्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी झा यांनी यापूर्वीच्या वित्त आयोगांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य होण्यापूर्वी, झा यांनी चौदाव्या वित्त आयोगाचे सदस्य सचिव म्हणूनही काम केले होते. त्यावेळी रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आयोगाचे अध्यक्ष होते.

वित्त आयोग ही केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक संबंधांवर सूचना-शिफारसी करणारी महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे. मुख्यत्वे केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या विभागणीचे सूत्र आयोगाकडून ठरविले जाते. १६ व्या वित्त आयोगाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आपल्या शिफारशी सादर करणे अपेक्षित आहे.

आयोगाच्या जबाबदाऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबरमध्ये १६ व्या वित्त आयोगासाठी कार्यकक्षा निश्चित केली. कर महसुलाची केंद्र आणि राज्यांदरम्यान विभागणी, त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा, देशाच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत, राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी आणि सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा या जबाबदाऱ्या १६ व्या वित्तीय आयोगावर असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी मातीतून चौथे प्रतिनिधित्व

सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक आणि िमट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक डॉ. निरंजन राजाध्यक्ष हे आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ज्ञ ठरले आहेत. यापूर्वी धनंजय गाडगीळ आणि विजय केळकर यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही वित्त आयोगात जबाबदारी निभावली होती.