उत्तर प्रदेशमधील अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिवशी अयोध्येत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीरामन्मभूमी ट्रस्टने देशभरातील सात हजारांहून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकणार आहेत. अशातच तमिळनाडू सरकारने या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याप्रकरणी थेट तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

सीतारमण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी तमिळनाडूतील द्रमुक सरकारवर निशाणा साधला आहे. सीतारमण यांनी म्हटलं आहे की, द्रमुक सरकारने राम मंदिरातील सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. दरम्यान, तमिळनाडू सरकारमधील मंत्री पी. के. शेखर बाबू यांनी एक्सवर पोस्ट करत सीतारमण यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे.

अर्थमंत्री सीतारमण यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तमिळनाडू सरकारने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमांच्या थेट प्रसारणावर बंदी घातली आहे. तसेच तमिळनाडूत श्रीरामाची २०० हून अधिक मंदिरं आहेत. यापैकी एचआरसीई संचालित मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने कुठलीही पूजा करण्यास, भजन, किर्तन, प्रसादाचे वाटप अथवा अन्नदान करण्याची परवानगी नाही.

हे ही वाचा >> VIDEO : भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधी थेट विरोधकांसमोर उभे ठाकले अन्…, ‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्मला सीतारमण यांनी आरोप केला आहे की, खासगी मंदिरांमध्येदेखील अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यास पोलीस मज्जाव करत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे तिथल्या आयोजकांना पोलीस धमकी देत आहे की, तुम्ही जर मंडप उभारले तर ते मंडप तोडले जातील आणि तुमच्यावर कारवाई केली जाईल. तमिळनाडूतील डीएमकेच्या नेतृत्वातील हिंदूविरोधी सरकारच्या या कारवाईचा मी निषेध करते.