एनआयटीमध्ये विद्यार्थी परिषद स्थापन करण्याचा आणि संस्थेत सर्व राष्ट्रीय महोत्सव साजरे करण्याबाबत एनआयटी-श्रीनगर विचार करणार आहे. तथापि, पंतप्रधआन नरेंद्र मोदी अथवा मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संस्थेच्या संकुलात तिरंगा फडकवावा, या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीबाबत मात्र काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
स्थानिक विद्यार्थ्यांशी चकमक उडाल्यानंतर बाहेरील विद्यार्थ्यांनी आपल्या काही मागण्या व्यवस्थापनाकडे केल्या होत्या. त्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला एनआयटी-श्रीनगरचे संचालक रजत गुप्ता, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी हजर होते. त्या बैठकीचे इतिवृत्त संस्थेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले असले तरी त्यामध्ये तिरंगा फडकाविण्याबाबतचा कोणत्ही उल्लेख नाही.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये दोन सदस्य बाहेरचे आहेत, ते एनआयटीमध्ये नेमके काय घडले या बाबत चौकशी करून आपला अहवाल १५ मेपर्यंत देणार आहेत, असेही एनआयटीच्यासंकेतस्थळावर म्हटले आहे. चौकशी पथकाने अंतरिम अहवाल दिला असून सदर समिती सविस्तर अहवाल देणार आहे.