शाळा, बाजार, रुग्णालयाजवळील मुख्य रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी बांधण्यात येणारे गतिरोधक हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, देशात आता रस्त्यांवर त्रिमितीय (3D) गतिरोधक आणण्याची संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुचवली आहे. गतिरोधक बांधण्याऐवजी त्याजागी 3D पद्धतीने गतिरोधकाचे चित्र रेखाटण्याची कल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा मानस आहे, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातून गतिरोधक हद्दपार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन गडकरींच्या या नव्या संकल्पनेचे काहींनी स्वागत केले आहे, तर काही जणांनी त्यास विरोध देखील केला आहे.
3D गतिरोधकाची संकल्पना अमेरिका आणि कॅनडामध्ये १४ वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. आपल्याला आता जाग आली, असे म्हणत एका ट्विटरकरांनी नाराजी व्यक्त केली, तर पुढे 3D गतिरोधक असल्याची कल्पना एकदा का वाहनचालकाला आली की पुढील वेळेस तो तेथून जाताना वाहनाची गती कमी करेल का? असा महत्त्वपूर्ण सवाल एका ट्विटरकराने उपस्थित केला आहे. एका नेटिझन्सने गडकरी यांच्या संकल्पनेचे स्वागत करत हे 3D गतिरोधक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रंग परावर्तित पद्धतीचे असावेत, असा सल्ला दिला आहे.
We are trying out 3D paintings used as virtual speed breakers to avoid unnecessary requirements of speed breakers pic.twitter.com/M5r6zkO6uU
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 26, 2016