केंद्रातील एनडीए सरकारमधल्या कार्यक्षम मंत्र्यांमध्ये रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. गडकरींचा कामाचा वेग आणि त्यांची प्रशासनावरची पकड या गोष्टींची नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. गडकरींच्या कार्यक्षमतेचे अनेक दाखले देतानाच अनेकदा त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा सक्षम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अशा कार्यक्षम मंत्र्याचा सरकारमध्ये बोलबाला असणं ही फार साहजिक बाब मानली जाते. मात्र, भाजपानं नुकत्याच जाहीर केलेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डामधून चक्क नितीन गडकरींना वगळण्यात आलं आहे. हे पाहून अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात आता काँग्रेसनं खोचक शब्दांत भाजपावर टीका करत नितीन गडकरींना वगळण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

बुधवारी भाजपाकडून पक्षाच्या संसदीय मंडळाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आल्याचं दिसून आलं. या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण,. इकबालसिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बी. एल. संतोष यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गडकरी आणि चौहान यांना वगळून त्याच्याजागी नव्या मंडळात येडियुरप्पा आणि सरबानंद सोनोवाल यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, याचवेळी भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीचीही घोषणा केली असून त्यामध्येही गडकरींचा समावेश नसल्याचं दिसून आलं आहे. या यादीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.

BJP Parliamentary Board: भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळलं

भाजपाच्या या निर्णयामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं असून काँग्रेसनं नेमकं यावरच बोट ठेवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. या क्लिपसोबत पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच गडकरींना वगळण्यात आल्याची पोस्ट करण्यात आली आहे.

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच, व्हिडीओ क्लिपमधून देखील या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

एकीकडे नितीन गडकरींच्या कार्यक्षमतेची चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांना भाजपाच्या केंद्रीय समितीतून वगळण्यात आल्यामुळे विरोधकांना मात्र आयतं कोलित मिळाल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari removed bjp parliamentery borad congress tweet targets bjp pmw
First published on: 19-08-2022 at 11:06 IST