आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेते एकमेकांना भेटून चर्चा करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील जेडीयूचे नेते तथा आमदार कपिल पाटील म्हणाले, ६ मे रोजी नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली होती. त्यानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज (११ मे) रोजी मुंबईत येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतील. या भेटीदरम्यान बिहारमध्ये होणाऱ्या विरोधीपक्षाच्या सभेत सहभागी होण्यासाठी ते दोघांनाही आमंत्रण देतील.

हेही वाचा – कर्नाटकात कोणाची सत्ता येईल? एक्झिट पोलचे अंदाज धुडकावत बसवराज बोम्मई म्हणतात, “वाढलेल्या मतदारांमुळे…”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार सातत्याने विरोधीपक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती.