भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना हिटलरच्या पंगतीला बसवल्याच्या दुसऱ्याच दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी डाव्या पक्षांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीसाठी जास्तीत जास्त पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकशाही मूल्ये जपणाऱ्या पक्षांनी जेवढे जमेल तेवढे एकत्र येण्याची आवश्यकता नितीशकुमार यांनी बोलून दाखवली. बुधवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या तिसऱ्या आघाडीच्या बांधणीच्या उद्देशाने बोलावण्यात आलेल्या परिषदेमध्ये संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश करात, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे देवेगौडा व्यासपीठावर एकत्र आले.
एकजूट दाखवण्याची आवश्यकता वाटली म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीच्या रूपाने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. “आम्ही जुगार खेळत नाही, आम्ही जोखीम उचलत आहोत. ज्या प्रकारे देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. धर्मांध तत्त्वांना सत्तेमधून बाहेर ठेवण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. अल्पसंख्यकांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक आहे,” असे नितीशकुमार भाषणामध्ये म्हणाले. ‘यूपीए’ आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनीदेखील या सभेला हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस देखील लवकरच तिसऱ्या आघाडीमध्ये दाखल होणार असल्याचे नितीशकुमार यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय राष्ट्रवादीसमोर खुला असल्याचे म्हटले आहे.
आठवड्यापूर्वी संयुक्त जनता दलाचे शरद यादव आणि ‘माकप’चे सिताराम येचुरी यांनी ‘धर्मांधते विरोधात जनतेची एकजूट’ या परिषदेची घोषणा केली होती.
वाढती महागाई व भ्रष्टाचाराच्या विरोधात असणाऱ्या बिगर काँग्रेस व बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याची भूमिका या परिषदेमागे असल्याचे सहभागी पक्षांच्या वतीने सांगण्यात आले.