बिहारचे माजी मुख्यमंत्री व जनता दल (यू)चे नेते नितीश कुमार यांनी सोमवारी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना भेटून १३० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. सरकार स्थापनेसाठी उशीर करण्यात आल्यास समर्थक आमदारांना राष्ट्रपतींसमोर हजर करण्याचा इशारा दिला, मात्र पक्षाने काढून टाकल्यामुळे कोंडीत सापडलेले मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीही या नेत्यांच्या पाठोपाठ राज्यपालांची भेट घेतली आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. आता सरकार स्थापनेत राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भूमिका महत्त्वाची
आहे.
जनता दल विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आलेले नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सुमारे तासभर चर्चा केली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव व जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव हेही त्यांच्यासोबत होते. राज्यपाल जी मुदत देतील, त्यानुसार आपण २४ किंवा ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्यास तयार असल्याचे मी त्यांना सांगितले. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकार स्थापन झालेले असावे अशी विनंती आपण त्यांना केली आहे, असे नितीश कुमार म्हणाले.
मांझी यांनी रविवारी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करून त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. हा खुला घोडेबाजार असून, राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप नितीश यांनी केला.
मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीही नंतर चार मंत्र्यांसह राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. नितीशकुमार यांची जनता दल विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेली निवड ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा केला. सभागृहात बहुमताची परीक्षा गुप्त मतदान पद्धतीने व्हावी आणि जनता दल (यू)च्या दोन प्रतिस्पर्धी गटांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी मतमोजणीच्या वेळी उपस्थित असावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली. मांझी समर्थकांच्या गटाने आपल्याला जनता दलाचे ४४ व राजदचे १२ अशा ५६ आमदारांचा ‘वचनबद्ध’ पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. बहुमताची परीक्षा होईल त्या वेळी हे सर्व मांझी यांच्यामागे उभे राहून त्यांच्या सरकारला पाठिंबा देतील. मात्र या आमदारांची ओळख सध्याच उघड करणे योग्य नाही, असे जद (यू)चे मुख्य प्रतोद राजीव रंजन यांनी सांगितले.
भाजप सभागृहात भूमिका स्पष्ट करणार -हुसेन
नवी दिल्ली: बिहारमधील राजकीय स्थितीला नितीशकुमार यांची सत्तालालसा कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने सध्या थांबा आणि प्रतीक्षा करा, असे धोरण अवलंबिण्याचे ठरविले असून मुख्यमंत्री जितन राम मांझी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडतील तेव्हा भाजप आपल्या रणनीतीबाबतचा निर्णय घेणार आहे.प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने भाजप स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. राज्यपालांनी निर्णय घेतल्यानंतर भाजप सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करील, असे भाजपचे प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी म्हटले आहे. जद(यू)मध्ये नैराश्य पसरले असून त्यामुळेच नितीशकुमार सत्तेवर येण्यास उतावीळ झाले आहेत, असेही हुसेन म्हणाले.
मांझी यांची जनता दलातून हकालपट्टी
जनता दल (यू)ने पद सोडण्यास नकार देणाऱ्या मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काढून टाकले. विधानसभेच्या बरखास्तीची शिफारस करण्याबाबत मांझी यांना अधिकार देणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती माजी मंत्री विजय चौधरी यांनी राज्यपालांना दिली.
मला सरकार स्थापन करण्याची संधी नाकारली गेली किंवा याबाबत चालढकल करण्यात आली, तर संयुक्त जनता दल, राजद, काँग्रेस, भाकप व १ अपक्ष अशा १३० समर्थक आमदारांना दिल्लीत राष्ट्रपतींच्या समोर हजर केले जाईल.
-नितीश कुमार, जनता दलाचे नेते
नितीशकुमार यांची जनता दल विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे. मी सभागृहात बहुमत सिद्ध करीन. सभागृहाच्या नेत्याऐवजी पक्षाच्या अध्यक्षांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर होती हे राज्यपालांना सांगितले.
– जितनराम मांझी,मुख्यमंत्री