नवी दिल्ली : ‘भाजपसह युती असताना नितीशकुमार अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपची साथ सोडून राष्टीय जनता दलासह इतर पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला,’ असे निवडणुकांचे प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी सांगितले.

एके काळी नितीशकुमार यांच्या निकट असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की बिहारमधील राजकीय घडामोडींचा परिणाम तूर्तास तरी बिहारपुरताच मर्यादित असेल. त्यामुळे अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर राजकीय उलथापालथ होण्याची कोणतीही शक्यता मला दिसत नाही. नितीशकुमार २०१७ ते २०२२ पर्यंत भाजपसोबत होते. परंतु अनेक कारणांमुळे ते भाजपची साथ देत असताना अस्वस्थ असल्याचे मला जाणवत होते. नितीशकुमार यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या महत्त्वाकांक्षेसंदर्भात प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले, की सध्याचा राजकीय घटनाक्रम फक्त बिहारपुरताच मर्यादित असल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये २०१२-१३ पासून सरकार बनवण्यासाठी सहा प्रकारच्या राजकीय आघाडय़ा करण्यात आल्या व दर वेळी नितीशकुमारच मुख्यमंत्री बनले. सध्याचे नवे सरकार हा राजकीय आघाडीचा सहावा प्रयोग आहे. मात्र, या सर्व वाटचालीत बिहारच्या स्थितीत कोणताही आमूलाग्र बदल झालेला नाही. आता हे नवे सरकार बिहारच्या हितासाठी काही चांगली पावले उचलेल, अशी आशा व्यक्त करतो. मात्र, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाची भ्रष्टाचारासहित अनेक मुद्दय़ांवरील धोरणे भिन्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.