पराभव निश्चित झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे बिहारमध्ये सुमारे दोन आठवडे सुरू असलेले राजकीय नाटय़ शुक्रवारी संपुष्टात आले. जनता दल (यू)चे नेते नितीश कुमार हे २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, राज्यपालांनी त्यांना तीन आठवडय़ात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे आणि त्यांना विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागू नये यासाठी आपण पदउतार होण्याचा निर्णय घेतला, असे कारण देऊन जितनराम मांझी यांनी आज बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला. कुणाच्या तरी निर्देशांनुसार काम करणारे अध्यक्ष उदयनारायण चौधरी हे विश्वासदर्शक ठरावादरम्यान गुप्त मतदानासाठी मुळीच संमती देणार नाहीत हे लक्षात आले, तेव्हा माझ्या समर्थक आमदारांना धोक्यात टाकणे योग्य होणार नाही हा विचार करून मी राजीनामा दिला, असे राजभवनवर राज्यपालांकडे राजीनामा सोपवून विधानभवनात न जाता आपल्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी सांगितले.
आपल्याला १४० आमदारांचा पाठिंबा होता, परंतु आपल्याला साथ देणाऱ्या आमदारांना रक्तपाताचा व छळाचा धोका लक्षात घेऊन पुढे न जाण्याचे आपण ठरवले, असा दावा मांझी यांनी केला. ८ मंत्री, जद (यू)चे ७ आमदार व एक अपक्ष आमदार त्यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. जनता दलाचे ४० ते ५२ आमदार माझ्या बाजूने होते, परंतु नितीश कुमार यांच्या भीतीने ते माझ्यासोबत दिसू इच्छित नव्हते, असे सांगून नितीश व अध्यक्ष चौधरी यांच्यावर मांझी यांनी शाब्दिक हल्ला चढवला.
दुपारनंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी विधिमंडळातील जनता दल (यू)चे नेते म्हणून निवड करण्यात आलेले नितीश कुमार यांना राजभवनावर पाचारण केले. आपण बिहारचे मुख्यमंत्री म्हणून येत्या रविवारी सायंकाळी ५ वाजता शपथ घेणार असून, राज्यपालांनी आपल्याला तीन आठवडय़ात, १६ मार्चपूर्वी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे, अशी माहिती नितीश यांनी पत्रकारांना दिली. विधानसभेचे नवे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्याबाबत आपले सरकार निर्णय घेईल, तसेच संयुक्त सत्रात राज्यपालांच्या भाषणाची तारीखही निश्चित करेल, असे ते म्हणाले. जद (यू), काँग्रेस, राजद, भाकप या पक्षांच्या आमदारांसह १ अपक्ष आमदार यावेळी त्यांच्यासोबत होता. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मांझी यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल आम्हाला खेद वाटत नाही, असे भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले. नितीश कुमार हे एका महादलिताचा ‘अपमान’ करत असल्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलो, एवढाच संदेश आम्हाला द्यायचा होता, असे ते म्हणाले.
नितीश कुमार यांचा माझींना टोला
जनता दल (यू) आणि समर्थक पक्षांनी ९ फेब्रुवारीलाच राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्याचा दावा केला होता. आजच्या परिस्थितीत आम्ही या दाव्याचा पुनरुच्चार केला. राज्यपालांनी आमची विनंती मान्य करून मला २२ तारखेला शपथ घेण्यास सांगितले असे नितीश कुमार म्हणाले. यापूर्वी, मांझी यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्रीपद सोडल्याबद्दल माफी मागितली. यापुढे मी असा भावनिक निर्णय कधीही घेणार नाही आणि आघाडीवर राहून नेतृत्व करेन असे ते म्हणाले. जद (यू) फोडण्याच्या सर्व ‘क्लृप्त्या’ अयशस्वी ठरल्यामुळेच मांझींनी राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला. आपण दलित व महादलितांच्या कल्याणासाठी केलेले काम सर्वाना माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी कथित ‘दलित कार्ड’ वापरणाऱ्या मांझींना टोला लगावला.