बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी रविवारी (७ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिराबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासह त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदार फतेह बहादूर सिंह यांच्या राम मंदिराबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थनही केलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षासह काही हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय जनता दल पक्षाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. भाजपा नेत्यांनी चंद्रशेखर आणि फतेह बहादूर सिंह यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदवला आहे. फतेह बहादूर बिहारमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते, “अयोध्येत आता रामाचं मंदिर बांधलं जात आहे. या मंदिरातून केवळ ढोंगी आणि मनुवादी समाजाचा विकास होऊ शकतो.” त्यानंतर फतेह बहादूर यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे राजदचे नेते आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी फतेह बहादूर यांचा बचाव केला. तसेच राम मंदिराबाबत नवीन वादग्रस्त वक्तव्य केलं.

राम मंदिराद्वारे रोजगार मिळणार आहेत का? असा प्रश्न फतेह बहादूर यांनी उपस्थित केला होता. तसेच अयोध्येचं अस्तित्व नाकारत ते म्हणाले, “ती जागा म्हणजे गौतम बुद्ध आणि सम्राट अशोकाची भूमी साकेत होती. अयोध्या अजिबात नव्हती. त्यामुळे साकेतच्या जमिनीवर विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये उभारायला हवी होती.” फतेह बहादूर यांचा बचाव करताना मंत्री चंद्रशेखर म्हणाले, “आपण आज हिंदुत्वापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. मंदिराचा मार्ग हा मानसिक गुलामगिरीचा मार्ग आहे आणि शाळेचा मार्ग हा प्रकाशाचा मार्ग आहे. खरंतर मंदिरांमध्ये लोकांचं शोषण होतं. राम हा तुमच्यात, माझ्यात आणि प्रत्येकात आहे, मग आपण त्याला शोधायला कुठे जाणार? देवाची स्थळं म्हणून ज्या जागा ठरवण्यात आल्या आहेत तिथे केवळ शोषण केलं जातं. या स्थळांद्वारे कुठल्या ना कुठल्यातरी समाजातील काही ठराविक लोक षडयंत्र रचून केवळं स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतात.”

हे ही वाचा >> काँग्रेसची मतदारसंघनिहाय ‘स्वतंत्र’ चाचपणी; सर्व जागांचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक नियुक्त

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यावर प्रतिक्रिया दिली, तसेच चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. नित्यानंद राय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, राम मंदिर हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. हे लोक काहीही बोलत असतात. मला कळत नाही की, यांचं आणि श्रीरामाचं काय वैर आहे. राम मंदिरावर यांचा कसला राग आहे, सातत्याने राम मंदिराचा विरोध का करत असतील? यांची नीती चांगली नाही. मला तर वाटतं, हे लोक भविष्यात बाबर (पहिला मुघल बादशाह), आणि अफझल गुरूची (दहशतवादी) पूजा करतील. परंतु, आपल्या या देशाला अश्फाक उल्लाह खान, कॅप्टन हमीद हवे आहेत. आपल्याला बाबर आणि मोहम्मद अली जिन्ना नको. या देशाला रामाची मर्यादा हवी आहे.