दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या बी.१.१.५२९ या करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरामध्ये खळबळ उडाली आहे. करोनाचा हा नवा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याचं सांगितलं जात असल्याने जगभरात चिंतेचं वातावरण आहे. मात्र भारतासाठी दिलासादायक वृत्त असं आहे की अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण देशात आढळून आलेला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सुत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेमधील करोनाच्या वाढत्या संसर्गामागे बी.१.१.५२९ व्हेरिएंट असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक बोलवली आहे.

नक्की वाचा >> फ्रेशर्स पार्टी पडली महागात… मेडिकल कॉलेजमधील १८२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह, ३००० कर्मचाऱ्यांच्या करणार चाचण्या

जागतिक आरोग्य संघटनेचे करोनासंदर्भातील तज्ज्ञ असणाऱ्या मारिया वेन केरकोव यांनी, “आम्हाला सध्या याबद्दल फारशी माहिती नाहीय. या व्हेरिएंटमध्ये फार मोठ्या संख्येने म्युटेशन (अंतर्गत संरचना बदलत राहण्याची क्षमता) आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्युटेशन असल्यावर हा विषाणू नक्की कसा परिणाम करणार हे सांगता येणं कठीण असतं,” असं केरकोव म्हणाले आहेत. याचबरोबरच वैज्ञानिकांनाही हा विषाणू फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वत:मध्ये बदल घडवणारा आहे.

करोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राकेश भूषण यांनी राज्यांना पत्रं पाठवली आहे. “एनसीडीसीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार करोनाच्या बी.१.१.५२९ चे बोत्सवाना (३), दक्षिण आफ्रिदा (६) आणि हाँगकाँग (१) येथे प्रकरणं समोर आली आहेत. या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आहेत,” असं भूषण यांनी पत्रात नमूद केलंय. भूषण यांनी सर्व राज्यांना दिलेल्या निर्देशांनुसार करोनासंदर्भातील धोकादायक स्तरामधील देशांच्या यादीत असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या व्यक्तींची योग्य तपासणी आणि स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे, असं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रा करोनाला वैतागले; म्हणाले, “करोना एखादी व्यक्ती असता तर त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये घेऊन…!”

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, देशातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त बैठकीत बोलताना आरोग्य सचिवांनी, सर्व राज्यांनी आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन तपासणी करावी तसेच या तपासणीच्या नोंदी ठेवाव्यात असं म्हटलं आहे.