नवी दिल्ली : अनेक देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. मात्र, भारतात या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आल्याचेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्र्यांनी ओमायक्रॉन विषाणूबाबत माहिती दिली. ‘‘सध्या १४ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मात्र भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. देशातील सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून काही संशयित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत,’’ असे मंडाविया यांनी सांगितले.

सध्या देशात करोनास्थिती नियंत्रणात आहे. मात्र अजूनही देश करोनामुक्त झालेला नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची काळजी घेत आहेत. घरोघरी लसीकरण ही केंद्राची मोहीम सुरू असून दररोज ७० ते ८० लाख लसमात्रा दिल्या जात आहेत. देशात आतापर्यंत १२४ कोटी लसमात्रा देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे ६७८ नवे रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई : राज्याच्या करोना रुग्णआलेखाची घसरण कायम आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६७८ रुग्ण आढळले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई १८०, पुणे जिल्हा २०३, ठाणे जिल्हा ७४, नगर जिल्हा ४९ रुग्ण आढळले. राज्यात सध्या ७,५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.