काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करून ही विरोधी पक्षांनी पसरविलेली अफवा असल्याचा दावा केला. केंद्रात नऊ वर्षांची अखंड सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसप्रणीत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना बुधवारी यूपीएच्या वर्धापन दिनी शेवटच्या वर्षांत संसदेतील सहकार्यासाठी विरोधी पक्षांना साकडे घालणे भाग पडले. भाजपप्रणीत रालोआ आणि अन्य विरोधी पक्षांनी पक्षीय मतभेद विसरून जनतेच्या भल्यासाठी अन्न सुरक्षा विधेयक, भूसंपादन विधेयक आणि अन्य विधेयकांना पारित करण्यासाठी सामूहिक हातभार लावावा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी यूपीएच्या वर्षदिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात बोलताना केले.
सरकारने वारंवार चर्चेची तयारी दाखवूनही संसदेच्या कामकाजात सतत व्यत्यय निर्माण झाल्यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके पारित होऊ शकली नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेप्रति कर्तव्यपूर्तीसाठी आमच्यापाशी अजूनही वेळ आहे, अशी भावना सोनिया गांधी यांनी संसदेत पारित न होऊ शकलेल्या त्यांच्या आवडत्या अन्न सुरक्षा विधेयकाविषयी व्यक्त केली. या वेळी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या चौफेर हल्ल्यानंतरही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे पंतप्रधानांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि त्यांच्या पाठीशी आपण उभे असल्याचा निर्वाळा देत त्यांच्यातील मतभेदांच्या चर्चेला विराम दिला.

पंतप्रधानांचे निरुत्साही भाषण
सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातही उत्साहाचा अभाव होता. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीतील सुधारणा, सर्वसमावेशक विकास, कल्याणकारी योजनांचे उत्तम व्यवस्थापन आणि बदलत्या जगाशी सुधारलेला समन्वय या चार मुद्दय़ांवर आपल्या सरकारने यश संपादन केल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.