पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन

रशियाकडून युरेनियम, खते आणि रसायनांच्या आयातीबद्दल काहीही माहिती नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेकडून या वस्तूंच्या आयातीबाबत भारताच्या विधानावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली.

‘‘मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. मला याची चौकशी करावी लागेल, परंतु आम्ही त्याचे उत्तर देऊ’’, असे ट्रम्प म्हणाले. चीनसह रशियन ऊर्जा खरेदी करणाऱ्या सर्व देशांवर १०० टक्के कर लादण्याची धमकी दिल्याच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना टक्केवारीचा उल्लेख केला नाही, परंतु असेच काहीतरी करणार असल्याचे सूतोवाच मात्र ट्रम्प यांनी केले.

‘अदानींविरुद्धच्या चौकशीमुळे पंतप्रधान हतबल’

नवी दिल्ली : गौतम अदानी यांची अमेरिकेत चौकशी सुरू असल्याने पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासमोर उभे राहू शकत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी बुधवारी ‘एक्स’वर केली. ‘डबल ए’ आणि रशियाशी तेल व्यापारादरम्यान आर्थिक संबंध उघड होण्याचाही धोका असल्याने मोदींचे हात बांधले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

युद्धे रोखल्याचा दावा

ट्रम्प यांनी २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी व्हाइट हाऊस ऑलिंपिक टास्क फोर्स स्थापन करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या वेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तान-मधील युद्ध रोखल्याचा पुनरुच्चार केला. हा दावा त्यांनी १० मेपासून ३० हून अधिक वेळा केला आहे. गेल्या पाच महिन्यांत पाच युद्धे रोखल्याचा दावा करतानाच युक्रेन संघर्ष संपवण्यास मदत केलेले सहावे युद्ध असावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.