Supreme Court on Motor Accident Claims: देशात रस्ते अपघातात वाढ होत असताना सर्वोच्च न्यायालयाने विमा संरक्षण मिळविण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. निष्काळजीपणामुळे बेदरकार वाहन चालवून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना मोटार वाहन कायद्याअंतर्गत भरपाई मिळणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २ जुलै रोजी एका प्रकरणात दिला.
लाइव्ह लॉ वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने बेजबाबदारपणे वाहन चालवले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कायदेशीर वारस विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईचा दावा करू शकत नाहीत. कर्नाटकमध्ये २०१४ रोजी घडलेल्या एका प्रकरणात न्यायाधीश पी.एस. नरसिंह आणि न्यायाधीश आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सदर निकाल दिला.
१८ जून २०१४ रोजी फियाट लाइन ही गाडी उलटून वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. यावेळी गाडीत चालकासह त्याचे वडील, बहीण आणि भाची असे कुटुंबियही होते. कुटुंबाने दावा केला की, गाडीचे टायर फुटल्यामुळे सदर अपघात झाला. परंतु पोलीस तपासात आणि आरोपपत्रात वेगळीच बाब समोर आली. चालकाने बेपर्वा आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झाल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.
लाइव्ह लॉच्या बातमीनुसार, मृत चालकाची पत्नी, मुलगा आणि पालकांनी मृताचे मासिक उत्पन्न ३ लाख रुपये असल्याचे सांगितले. तसेच चालक कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याचे सांगून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध ८० लाख रुपयांच्या भरपाईचा दावा दाखल केला होता.
अपघातानंतर मोटार अपघात दावे न्यायधिकरणाने कुटुंबाचा दावा फेटाळून लावला होता. वाहन चालक स्वतःच्या मृत्यूस स्वतःच कारणीभूत आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यांतर्गत त्याला बळी मानले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर सदर कुटुंबाने या निर्णयास कर्नाटक उच्च न्यायालयात नोव्हेंबर २०२४ मध्ये आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. तसेच २००९ च्या सर्वोच्च न्यायालयातील ‘निंगम्मा विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या खटल्यातील निकालाचे उदाहरण दिले.
कोणत्या पुराव्याच्या आधारे दावा फेटाळला गेला
पोलिसांच्या आरोपपत्रात निष्काळजीपणामुळे वाहन चालवून अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्षदर्शींचा जबाबही नोंदविण्यात आला होता. कुटुंबाने टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला होता, मात्र या दाव्याची पुष्टी करणारा कोणताही तांत्रिक पुरावा मिळाला नाही. या सर्व पुराव्याची खातरजमा करून वाहन चालकच स्वतःच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला गेला.