विरोधकांच्या महाआघाडीला नेता, नीती आणि सिद्धांत नाहीत अशी घणाघाती टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी त्यांनी नागपुरात प्रचारसभा घेतली. याच प्रचारसभेत त्यांनी महाआघाडीवर निशाणा साधला आहे. जर तुम्हाला देशात शांतता हवी असेल, देशाचं नेतृत्त्व चांगल्या हाती द्यायचं असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
विदर्भातल्या १६ लाख शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं. नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर नागपूरच नाही संपूर्ण विदर्भाचा आणखी विकास होणार आहे. नागपुरात १०० कोटींची गुंतवणूक करून आम्ही नागपूर हे शहर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करतो आहे. नितीन गडकरी यांना पूलकरी म्हटलं जायचं इतर नावं दिली जायची कारण त्यांनी कामं तशीच केली आहेत. आता देशातही त्यांनी त्याच प्रकारे काम केलं आहे. नाग नदीच्या स्वच्छतेसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी केलेली विकासकामं बघा आणि काँग्रेसच्या खासदारांनी केलेली विकासकामं पहा म्हणजे तुम्हाला नेमका फरक लक्षात येईल असाही टोला अमित शाह यांनी लगावला. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वाधिक निधी देणारं सरकारही मोदी सरकार आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली चांगलं काम करत आहेत. नागपुरात इतकी विकासकामं झाली मात्र यावेळी काँग्रेसला उमेदवार सापडत नाही कारण भाजपाने काँग्रेसला धूळ चारली आहे असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
गरीब शेतकऱ्यांना आम्ही पेन्शन देण्याची योजना आणली आहे. पुन्हा एकदा या देशावर मोदींचेच सरकार येणार आहे, त्यांना भरभरून मतं द्या असं आवाहनही अमित शाह यांनी म्हटलं आहे. चाळीस लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना आम्ही जीएसटीतून सूट दिली आहे. गरीब मुलांसाठी १० टक्के आरक्षण आणले आहे. त्याचा फायदाही मागास आणि गरीब मुलांना होणार आहे. पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वासही त्यांनी भाषणात व्यक्त केला. पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक करून आम्ही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.