50 Rupee Coin Introduction Update: केंद्र सरकारने ५० रुपयांच्या नाण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ५० रुपयांचे नाणे जारी करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. याचिकाकर्त्यांनी दृष्टिहीनांसाठी ५० रुपयांची नाणी जारी करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. सध्या बाजारात १, २, ५ आणि २० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने मंगळवारी न्यायालयाला सांगितले की, बाजारात ५० रुपयांची नाणी आणण्याची कोणतीही योजना नाही. कारण लोक सध्याच्या १० आणि २० रुपयांच्या नाण्यांपेक्षा नोटा पसंत करत आहेत.
सरकारने न्यायालयाला सांगितले की, “आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने २०२२ मध्ये सध्या बाजारात असलेली नाणी आणि नोटांच्या वापराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये असे दिसून आले की, लोक १० आणि २० रुपयांच्या नाण्यांपेक्षा नोटांना प्राधान्य देत आहेत.”
न्यायालयाला असेही सांगण्यात आले आहे की, सर्वेक्षणादरम्यान लोकांनी नाण्यांच्या वजन आणि आकाराशी संबंधित त्यांच्या समस्या देखील मांडल्या होत्या. विशिष्ट मूल्याचे नाणे जारी करण्यासाठी अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. यामध्ये लोक नाणे स्वीकारण्यास तयार आहे की नाही आणि दैनंदिन व्यवहारात ते किती प्रमाणात वापरले जाईल याचा समावेश आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, चलनी नोटांच्या डिझाइनमुळे दृष्टिहीन लोकांना येणाऱ्या समस्यांवर एक अभ्यास करण्यात आला होता. १, २, ५, १०, २०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की, दृष्टिहीन लोकांना त्या समजतील, परंतु ५० रुपयांच्या नोटेच्या बाबतीत असे नाही.
“५० रुपयांच्या नोटेवर कोणतेही इंटॅग्लिओ प्रिंटिंग किंवा स्पर्शिक खुणा नाहीत, ज्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना त्या ओळखण्यासाठी अडचणी येत आहेत”, असेही याचिकेत म्हटले आहे.
यावर अर्थमंत्रालयाने उत्तर दिले की, महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांमध्ये उंचावलेल्या (इंटॅग्लिओ) प्रिंटिंगच्या स्वरूपात ओळख चिन्हे नाहीत.
“रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, कमी मूल्याच्या नोटांमध्ये इंटॅग्लिओ प्रिंटिंग पुन्हा सुरू करणे अशक्य असल्याचे आढळून आले, कारण हाताळणीच्या उच्च वारंवारतेमुळे अशा छपाईचा स्पर्शिक परिणाम अधिक वेगाने कमी होतो. कमी मूल्याच्या नोटा अधिक प्रमाणात प्रसारित होत असल्याने, कालांतराने स्पर्शिक वैशिष्ट्यांचा ऱ्हास अधिक स्पष्ट होतो. शिवाय, या मूल्यांमध्ये इंटॅग्लिओ प्रिंटिंग पुन्हा सुरू केल्यास चलन उत्पादनाच्या खर्चावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतील”, असे अर्थमंत्रालयाने उत्तरात म्हटले आहे.