उत्तर प्रदेशात कट्टरतावादी हिंदू संघटनांच्या वाढत्या उच्छादावरून करण्यात येत असलेल्या टीकेला योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एखाद्याने आमची बदनामी करायचीच ठरवले असेल तर आमचा नाईलाज आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सहारनपूर आणि आग्रा येथे काही दिवसांपूर्वी भाजप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले होते. यावेळी एक खासदार आणि पोलीस अधिकारी जखमी झाला होता. तसेच गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात स्वयंघोषित गोरक्षकांचा उपद्रवही वाढला आहे. बुलंदशहरमध्ये नुकतेच हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम तरूणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांकडून योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आले. अनेक इशारे देऊनही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन का केले जात आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, एखाद्याने विशिष्ट संघटनेला बदनाम करायचे ठरवलेच असेल तर आमचा नाईलाज आहे. बुलंदशहरची घटना ही संघटनेने केलेला हल्ला नसून हा प्रकार वैयक्तिक वादातून घडल्याचे या प्रकरणातील पीडितांनी मान्य केले आहे. उत्तर प्रदेशात कोणताही भेदभाव नसून कायद्याचे राज्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कोणीही असुरक्षित नाही, हे मी हमी देऊन सांगू शकतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी स्थापन केलेली हिंदू युवा वाहिनी ही संघटना सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी संघटनेत नव्या सदस्यांचा प्रवेश बंद केला होता. याशिवाय, त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गुप्त बैठकही घेतली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावलेही होते. सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत नेण्यात कोणतीही कसूर ठेऊ नका. सरकारी कामांमध्ये त्रुटी आढळल्यास सरकारी अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. कोणत्याही अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करु नका, अशी ताकीद त्यांनी हिंदू युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर भाजपच्या राज्यस्तरीय मेळाव्यातही योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना आपण आता सत्ताधारी आहोत याचे भान ठेवून वागा, असा सल्ला दिला होता. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेता कामा नये. आपण सत्ताधारी आहोत याचे भान ठेवून स्वत:ची मानसिकता बदलायला पाहिजे. आपण जेव्हा इतरांचे वर्तन कायदेशीर असावे, अशी अपेक्षा करतो तेव्हा आपण स्वत:ही कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्हाला काही वावगे आढळले तर सरकारला ती गोष्ट लक्षात आणून द्या, असे योगी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांना सांगितले होते.