फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोऱ्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. या वर्षभरात दहशतवाद्यांनी घुसखोरीचे फक्त दोनच यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यातील एक म्हणजे रविवारी उरी सेक्टरमध्ये झालेली घुसखोरी होय. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला होता, असे काश्मीरमधील लष्कराच्या सर्वोच्च कमांडर लेफ्टनंट जनरल डी पी पांडे यांनी सोमवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीबाबत बोलताना, लेफ्टनंट जनरल डी पी पांडे म्हणाले की, काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांबद्दल चिंता करण्याची गरज नाही. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून २५ फेब्रुवारीला युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्याचं उल्लंघन झालंय का, या प्रश्नाचं उत्तर देताना पांडे म्हणाले, “या वर्षी असे काहीही झाले नाही. किमान काश्मीर खोऱ्यात तरी युद्धबंदीचे शून्य उल्लंघन झाले आहे. खरं सांगायचं तर, सीमेपलीकडून कोणतीही हालचाल  झाली नाही. आम्ही युद्धबंदी उल्लंघनासाठी पूर्णपणे तयार आहोत. सीमेपलीकडून कोणताही हालचाल झाल्यास आम्ही त्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत,” असंही लेफ्टनंट जनरल यांनी सांगितलं.

काश्मीरमध्ये तालिबानच्या प्रभावाबद्दल पांडे म्हणाले की, “तुम्ही का चिंतेत आहात? तुम्ही सुरक्षित आहात आणि सुरक्षित राहाल.” ते पुढे म्हणाले की, “जर कोणी शस्त्र उचलले तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. मग तो तालिबानी असो, परदेशी दहशतवादी असो किंवा स्थानिक दहशतवादी. आम्हाच्या त्याच्याशी काहीच घेणं-देणं नाही. जो कोणी शस्त्र उचलतो त्याला आत्मसमर्पणाची संधी दिली जाईल, तसं न केल्यास तो मारला जाईल,” असंही ते म्हणाले.

खोऱ्यात सध्या ६०ते ७० दहशतवादी पाकिस्तानी आहेत. त्यांचा हेतू हा हल्ला करण्याचा नसून स्थानिक तरुणांना हातात शस्त्र देऊन हल्ल्यासाठी प्रेरित करणे हा आहे, जेणेकरून ते चकमकीत मारले जातील. जेव्हा आपल्या देशातील, आमच्या काश्मीरमधील एक तरुण मुलगा मारला जातो तेव्हा त्याचा त्यांना एक प्रकारे फायदाच होतो, कारण आम्ही त्यांना मारतो म्हणून त्यांच्या कुटुंबीयांचा आमच्यावर राग असतो, असं पांडे म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No violation instigation by pak since ceasefire in feb says gen d p pandey hrc
First published on: 21-09-2021 at 10:14 IST