Pakistan – Afghanistan Peace Talks US Drone Attacks : पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये ११ व १२ ऑक्टोबर रोजी संघर्ष उफाळून आला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले, सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला, त्यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या सीमावर्ती तळांवर हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांत जवळपास युद्ध सुरू झालं होतं. दरम्यान, तुर्कीये व कतारने पुढाकार घेत युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरू केले. दोन्ही देशांमध्ये अनेक शांतता चर्चा पार पडल्या. मात्र, त्यावर ठोस तोडगा निघाल नाही. तालिबान व पाकिस्तानमध्ये खटके उडत असतानाच पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकली आहे.
तालिबान व पाकिस्तानमध्ये तुर्कीये येथे पार पडलेल्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर खापर फोडलं आहे. मात्र, याचा भारताचा कसलाही संबध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. उलट अमेरिकेच्या ड्रोन्समुळे उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेले ड्रोन हल्ले रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यामुळे अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला, त्याचा उभय देशांमध्ये चालू असलेल्या चर्चेवर थेट परिणाम झाला आणि ही चर्चा निष्फळ ठरली. इंडिया टूडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
चर्चा फिस्कटण्याचं कारण काय?
अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या चर्चेतील एका मध्यस्थाने म्हटलं आहे की तालिबान शासन अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवर हल्ला होऊ देणार नाही. परंतु, त्याआधी पाकिस्तानी हवाई सीमांचं उल्लंघन थांबवलं पाहिजे. पाकिस्तानच्या सरकारने त्यांच्या भूमीवरून अफगाणिस्तानमध्ये होणारे ड्रोन हल्ले बंद करावेत. मात्र, पाकिस्तानने तालिबानची ही अट मान्य करण्यास नकार दिल्यामुळे उभय देशांमधील चर्चा फिस्कटली आहे.
दरम्यान, अफगाण व पाकिस्तानचे प्रतिनिधी आज इस्तंबूल येथे पुन्हा एकदा चर्चेला बसले आहेत. टोलो न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संघर्ष टाळण्यासाठी मध्यस्थांचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
तुर्कीये येधील चर्चेच्या सुरुवातीलाच ड्रोन हल्ल्यांचा विषय निघाला. एक दुसरा देश अफगाणिस्तानच्या भूमीवर ड्रोन हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. टोलो न्यूजने याबाबत म्हटलं आहे की हा दुसरा देश म्हणजेच अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प यांचं लष्कर पाकिस्तानमधून अफगाणिस्तामध्ये ड्रोन हल्ले करत आहे.
