भोपाळ पोलिसांनी एक बांगलादेशी नागरिक अब्दुल कलाम याला अटक केली आहे. हा इसम आधी मुंबईत आणि गेल्या ८ वर्षांपासून नेहा या नावाने ट्रान्सजेंडर असल्याची खोटी ओळख दाखवून राहत होता. भोपाळ पोलिसांनी या इसमाला अटक करत बेकायदेशीर स्थलांतर आणि ओळख लपवल्यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल याने वयाच्या १०व्या वर्षी भारतात प्रवेश केला. भोपाळ इथे स्थायिक होण्यापूर्वी तो मुंबईत सुमारे दोन दशके राहिला आहे. अब्दुल याने ट्रान्सजेंडर अशी ओळख धारण केली आणि स्थानिक ट्रान्सजेंडर समुदायाचा सक्रीय सदस्य तो बनला. स्थानिक एजंटच्या मदतीने त्याने बनावट कागदपत्रांचा वापर करून रेशन कार्ड, आधार कार्ड आणि इतकंच नाही तर पासपोर्टसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळवली.

पोलीस तपासात असे आढळले की, अब्दुल हा बनावट कागदपत्र आणि ओळखीसह भारतात केवळ राहतच नव्हता तर बनावट भारतीय पासपोर्ट वापरून परदेशातही प्रवास करत होता. त्याने बुधवाडा परिसरात अनेकवेळा घरे बदलली होती. आतापर्यंत सर्वजण त्याला नेहा या नावाने ओळखत.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, अब्दुल महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर कारवायांमध्ये सहभागी होत होता. त्यामुळे त्याची ही बनावट ओळख कुठल्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. ट्रान्सजेंडर समुदायातील इतर सदस्य या फसवणुकीत सहभागी होते की नकळतपणे मदत कर होते याचा तपास पोलीस करत आहेत.

अब्दुलला बनावट ओळखपत्रे मिळवून देण्यास मदत करणाऱ्या दोन स्थानिक तरूणांची सध्या चौकशी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, हे बेकायदेशीर स्थलांतर आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठीचे एक मोठे नेटवर्क आहे. अब्दुलच्या मोबाइल फोनवरील कॉल रेकॉर्डिंग आणि चॅट्सची तपासणी केली जात आहे.

अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक शालिनी दीक्षित म्हणाल्या की, “तो गेल्या ८ ते १० वर्षांपासून भोपाळमध्ये राहत आहे. त्यापूर्वी तो महाराष्ट्रात होता. आम्हाला अशी माहिती मिळाली आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. यादरम्यान तो बांगलादेशलाही गेला आहे आणि आम्ही संबंधित विभागांकडून अहवालाची वाट पाहत आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणाने कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये खळबळ उडवली आहे. केवळ ओळखीच्या फसवणुकीमुळेच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या संभाव्य परिणामांमुळेदेखील बनावट कागदपत्रांचा वापर करून एका परदेशी नागरिकाने वर्षानुवर्षे भारतातील शहरात राहणे याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.