मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी नेहमीच आपली चहाविक्रेत्याची पाश्र्वभूमी सांगतात. मात्र मोदी यांनी कधीही चहाविक्रीचा व्यवसाय केला नाही,ते उपाहारगृह कंत्राटदार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस  नेते अहमद पटेल यांनी केला आहे.
मोदी यांचा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम म्हणजे निवडणूक नाटक असल्याचे पटेल म्हणाले. मोदी हे चहाविक्रेते नव्हते तर उपाहारगृह कंत्राटदार होते, अशी माहिती आपल्याला चहाविक्रेत्यांच्या संघटनेकडूनच मिळाल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.
मोदी यांच्या गुजरातच्या विकासाच्या दाव्यावरही पटेल यांनी हल्ला चढविला. गुजरातच्या विकासाचे मॉडेल म. गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या विचारसरणीवर आधारित आहे, असेही ते म्हणाले. काही व्यक्तींना अचानक सत्तालाभ झाला आणि त्यानंतर ते गांधीजी, पटेल आणि आंबेडकर यांची विचारसरणी विसरले, असेही पटेल म्हणाले.