दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जातेय. मद्य धोरण घोटाळ्यातील गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, एका विद्यमान मुख्यमंत्र्याला तुरुंगात डांबल्याने विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर, आता आम आदमी पक्षाने डीपी मोहिम सुरू केली आहे. आपच्या नेत्या आतिशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

एएनआयशी बोलताना आतिशी म्हणाल्या, “अरविंद केजरीवला यांची प्रेरणा घराघरांत पोहोचण्यासाठी या देशात सोशल मीडियावर डीपी कॅम्पेन सुरू करत आहोत. आज दुपारी तीन वाजल्यापासून आम आदमी पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आपला डीपी बदलत आहेत.” दरम्यान, डीपीला अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील फोटो असून ‘मोदीजी का सबसे बडा डर केजरीवाल’ असं या फोटोवर लिहिलं आहे.

इंडिया आघाडीकडून ३१ मार्चला महारॅलीचं आयोजन

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने इंडिया आघाडीतील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही अटक झाल्याने केंद्र सरकारवर टीका केली जातेय. भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेतला जात असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या विरोधात इंडिया आघाडीने ३१ मार्च रोजी महारॅलीचं आयोजन केलं आहे. या महारॅलीत इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्ष सामिल होणार आहेत.

हेही वाचा >> अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत महारॅलीचंं आयोजन!

“३१ मार्चला रामलीला मैदानात सकाळी १० वाजता इंडिया आघाडीकडून महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या देशातील लोकशाही वाचवण्याकरता या रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने लोकशाहीवर हल्ला झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते. काँग्रेसची खाती निष्क्रिय केली जातात. आता प्रश्न निर्माण होतोय की रॅलीला परवानगी मिळेल की नाही. विरोधकांना निवडणुकाच लढवू दिले जात नाहीय, त्यामुळे देशात लोकशाही कशी वाचेल?” असा प्रश्न आपच्या नेत्या आतिशी यांनी विचारला होता.