उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बुधवारी बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी तातडीने बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. मात्र, अनेकजण गंभीररित्या जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेत आवश्यक ती पावले उचलली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मॉरिशिअसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रशासनाला बचाव आणि मदतकार्याच्यादृष्टीने आवश्यक ती पावले तातडीने उचलण्यास सांगितले आहे.

बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ५०० मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला आहे. अनेक कामगार आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना अॅम्बुलन्सच्या सहाय्याने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून अॅम्ब्युलन्स मागवण्यात आल्या आहेत. या स्फोटानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले कामगार घाबरून सैरावैरा पळताना दिसत होते. सध्या खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत बाहेरच्या लोकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे ३२ जवान रायबरेलीला रवाना झाले आहेत.