Nuke India, Kill Donald Trump Sentences On Rifle: अमेरिकेतील राजकीय अभ्यासक लॉरा लूमर यांनी बुधवारी मिनेसोटा कॅथोलिक शाळेत गोळीबार करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची छायाचित्रे शेअर केली आहेत. शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये सामूहिक गोळीबारात वापरल्या गेलेल्या शस्त्रांवर ‘माशाल्लाह’, ‘न्यूक इंडिया’ (भारतावर अणुबॉम्ब टाका), ‘किल ट्रम्प’ आणि ‘इस्रायल मस्ट फॉल’ असे लिहिलेले दिसत आहे.

रॉबिन वेस्टमन नावाच्या या आरोपी तरुणीने अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर काचेच्या खिडक्यांमधून गोळीबार केला. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्यानंतर या तरुणीनेही आत्महत्या केली. ही आरोपी तरुणी या शाळेची माजी विद्यार्थिनी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींपैकी १४ मुले ६ ते १५ वयोगटातील आहेत, जी सर्व वाचतील अशी अपेक्षा आहे. यासह जखमींमध्ये तीन वृद्धांचा समावेश आहे.

“मिनेसोटात गोळीबार करणाऱ्या तरुणीने तिच्या बंदुकीवर माशाल्लाह आणि न्यूक इंडिया लिहिले होते. याचबरोबर इस्रायल मस्ट फॉल असेही लिहिले होते. ही तरुणी भारतविरोधी आणि यहुदीविरोधी इस्लामिक प्रचाराने प्रभावित होती हे स्पष्टपणे दिसत आहे. इल्हान ओमरच्या जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणीने कॅथोलिक लोकांना मारताना पाहणे खरोखर धक्कादायक नाही. हे रेड-ग्रीन युतीचे आणखी एक उदाहरण आहे”, असे लॉरा लूमर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी सामूहिक हत्याकांडात वापरल्या गेलेल्या शस्त्रांची छायाचित्रेही शेअर केली आहेत.

दरम्यान, हल्ल्याच्या अगदी आधी, गोळीबार करणाऱ्या तरुणीने युट्यूबवर दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. ज्यात तिच्या कुटुंबाला लिहिलेली एक हस्तलिखित सुसाईड नोट होती, ज्यामध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित त्रास आणि आत्महत्येच्या विचारांचा उल्लेख केला होता. दरम्यान अधिकाऱ्यांनी हे व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकले आहेत.

दरम्यान, एफबीआयचे संचालक काश पटेल म्हणाले की, एफबीआय या घटनेकडे “देशांतर्गत दहशतवादाचे कृत्य आणि कॅथोलिकांना लक्ष्य करून केलेला द्वेषपूर्ण गुन्हा” म्हणून पाहत आहे. मृतांमध्ये फक्त ८ आणि १० वर्षांची दोन मुले होती, जी शाळेतील सकाळच्या प्रार्थनेवेळी गोळीबारात जागीच ठार झाली आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मिनियापोलिसमध्ये झालेल्या इतर तीन गोळीबारांच्या घटनांशी या हल्ल्याचा संबंध दिसत नाही, ज्यामध्ये जेसुइट हायस्कूलमधील एका घटनेचाही समावेश आहे.