४७ हजार बळी; अर्थव्यवस्थेवरील गंभीर संकटांमुळे अनेकांचे रोजगार धोक्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या गुरुवारी १० लाखांजवळ पोहचली. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

पृथ्वीच्या निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून, यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे.

या महासाथीने जागतिक अर्थव्यवस्थेतही अनर्थ माजवणे सुरू ठेवले असून, स्पेनने एकाच महिन्यात नोकऱ्या गमावलेल्यांची सर्वाधिक संख्या जाहीर केली आहे, तर अमेरिकाही लवकरच त्या देशातील प्रचंड प्रमाणावर गमावण्यात आलेल्या नोकऱ्या उघड करण्याची अपेक्षा आहे.

डिसेंबरमध्ये चीनमध्ये सर्वप्रथम उगम झालेल्या कोविड-१९ चा ९ लाख ४० हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून, त्यात युरोपातील ५ लाख लोकांचा समावेश आहे. जगभरातील ४७ हजार लोक यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

गेल्या पाच आठवडय़ांत करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये घातक वेगाने वाढ झाली असून, गेल्या एकाच आठवडय़ात बळींची संख्या दुप्पट झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अधानोम घेब्रेसिस यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या  १ दशलक्षापर्यंत, तर बळींची संख्या ५० हजारांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी बुधवारी सांगितले.

ब्रिटन व फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये बुधवारी एकाच दिवसातील सर्वाधिक करोना बळींची नोंद झाली, मात्र या विषाणूचा सर्वात जास्त फटका बसलेल्या इटली व स्पेन या देशांत संसर्ग होण्याचा दर कमी होत असल्याचे दिसून आले.

स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत करोनामुळे विक्रमी ९५० लोक बळी गेल्यामुळे त्या देशात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०००३ झाली आहे. करोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजारांपार गेल्याचे स्पेन सरकारने सांगितले. मात्र, करोनाची महासाथ तेथे ‘स्लोडाऊन’ टप्प्यात प्रवेशली असून नव्याने संसर्ग आणि मृत्यू यांचा दर कमी झाला आहे, असे आरोग्यमंत्री साल्वाडोर इल्ला म्हणाले.

करोनाचा परिणाम प्रामुख्याने वृद्ध, तसेच पूर्वीच शारीरिक आजार असलेल्यांवर झाला आहे; तथापि तो कुठल्याही वयोगटातील लोकांचे जीव घेऊ शकतो असे अलीकडच्या प्रकरणांवरून अधोरेखित झाले आहे. करोनाच्या मृतांमध्ये फ्रान्समधील १६ वर्षांच्या, बेल्जियममधील १२ वर्षांच्या आणि ब्रिटनमधील १३ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

जगभरात जेवढय़ा लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी जवळजवळ एक चतुर्थाश लोक अमेरिकेतील आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत तेथील करोनाबळींची संख्या ५ हजारांपलीकडे पोहचल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले. तेथील ताज्या बळींमध्ये गेल्या आठवडय़ाअखेर कनेक्टिकटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६ आठवडय़ांच्या एका बाळाचा समावेश आहे.

‘आजपासून आगामी दोन आठवडे, विशेषत: येते काही दिवस आमच्यासाठी भयानक असतील’, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ‘हे सारे अतिशय हृदयद्रावक आहे’, असे ते म्हणाले.

निम्म्याहून अधिक युरोपीय नागरिक : जगभरात करोनाची लागण झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजे ५ लाखांहून अधिक लोक युरोपातील आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारे एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. युरोपातील करोनाबाधितांची संख्या ५,०८,७२१ इतकी झाली असून, करोना विषाणूने या खंडात ३४ हजार ५७१ बळी घेतले आहेत. जगभरात हाच आकडा अनुक्रमे ९,४०,८१५ आणि ४७ हजार ८३६ इतका आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्यांपैकी इटलीत १३ हजार १५५, तर स्पेनमध्ये १०००३ बळी गेले असून, या दोन्ही देशांमध्ये १ लाखाहून अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याचे निश्चित निष्पन्न झाले आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशा लोकांची अनेक देश केवळ तपासणी करत असल्यामुळे, करोनाबाधित आणि करोनामृत्यू यांची खरी संख्या यापेक्षा बरीच जास्त असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of corona positive around the world is close to 10 million abn
First published on: 03-04-2020 at 00:38 IST