अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुस्लीमविरोधी धोरणांच्या संदर्भात टीका केली आहे. मुस्लिमांना अमेरिकेत येऊ देणार नाही व स्थलांतरितांना रोखण्यासाठी प्रसंगी अमेरिका-मेक्सिको सीमेलगत भिंती बांधू, असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या मुस्लीमविरोधी धोरणांमुळे दहशतवादाविरोधातील लढाईत मदत करणारे मित्र देश अमेरिकेला सोडून जातील व ती लढाई कमकुवत होईल, असे ओबामा यांनी यावर म्हटले आहे.

ओबामा यांनी रूटगर्स विद्यापीठात ट्रम्प यांचे नाव न घेता केलेल्या भाषणात सांगितले, की जग पूर्वी कधी नव्हते एवढे आज जोडले गेलेले आहे. त्यामुळे भिंती बांधून ते बदलता येणार नाही. स्थलांतरितांना रोखण्यासाठी अमेरिका व मेक्सिको सीमेवर भिंती बांधू, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते.

ओबामा म्हणाले, की राजकारण व मानवी जीवनात अज्ञान हा सदाचार असत नाही. अमेरिका जेवढी चांगली आहे, तेवढेच जगही चांगले आहे. आज अमेरिकेत जास्त चांगली लोकशाही आहे. जगातही सगळे वाईट नाही. पोलिओसारख्या रोगांचे उच्चाटन झाले आहे. दारिद्रय़ कमी होत आहे, बालमृत्यूंचे प्रमाण कमी होत आहे. अध्यक्ष म्हणून माझे पहिले कर्तव्य हे अमेरिकेची सुरक्षा व भरभराट हे आहे व नागरिक म्हणून देशाला प्रथम स्थान देणे अपेक्षितच आहे पण गेली दोन दशके पाहिली तर त्यातून आपल्याला एकच शिकवण मिळते, ती म्हणजे आपण एकटय़ाने, वेगळे राहून आव्हानांना तोंड देऊ शकत नाही, समस्या सोडवू शकत नाही. जेव्हा जगातील इतर राष्ट्रे एकमेकांपासून फटकून वागू लागली, तेव्हा दहशतवाद्यांना व त्यांच्या विनाशी विचारसरणीला वाव मिळाला व आज तोच दहशतवाद अमेरिकेची दारे ठोठावत आहे. जेव्हा विकसनशील देश आरोग्यव्यवस्था नीट राबवत नाहीत, तेव्हा झिका व इबोलाचा प्रसार होतो व त्याचा अमेरिकेलाही फटका बसतो. त्यामुळे कुठली भिंत या संकटांचा सामना करू शकणार नाही. मुस्लिमांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला आव्हान देताना ते म्हणाले, की वेगळे राहून किंवा मुस्लिमांना वेगळे पाडून, वेगळी वागणूक दिली तर आपल्या देशाच्या मूल्यांशी ती प्रतारणा ठरेल. दहशतवादविरोधी आघाडीत जे देश अमेरिकेला साथ देत आहेत, ते यामुळे अमेरिकेपासून वेगळे होतील. जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्याला कुणाला चांगले काही करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी अमेरिका हे आकर्षणाचे केंद्र आहे. ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताकद अमेरिकेत आहे, किंबहुना त्यामुळेच अमेरिकेची वाढ झाली व तेथे नवप्रवर्तन घडून आले, भिंती बांधून आपण आव्हानांचे खापर सतत स्थलांतरितांवर फोडत राहिलो, तर आपण अमेरिकेचा इतिहास विसरलो असे होईल.