इराणसोबत झालेल्या वादग्रस्त अणुकार्यक्रम नियंत्रण समझोता कराराचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वागत केले असून इस्रायलने मात्र त्यांच्या देशाचे अस्तित्व धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली आहे.
ओबामा यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत झालेल्या ऐतिहासिक समझोत्याचे स्वागत करताना सांगितले की, मध्यपूर्वेत आणखी एक युद्ध जन्माला घालण्यापेक्षा हा करार केव्हाही चांगलाच आहे त्यामुळे इराणचे अण्वस्त्रे तयार करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. हा करार गेले अनेक दिवासांपासून अपेक्षित होता. स्वित्र्झलडमधील लॉसेन येथे इराण व सहा जागतिक देशांसमवेत या वाटाघाटी झाल्या. पाश्चिमात्य देशांनी आतापर्यंत इराणचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण असल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला नव्हता.
ओबामा यांनी व्हाइट हाऊस येथे रोझ गार्डनमध्ये सांगितले की अमेरिका व मित्र देश यांनी इराणशी ऐतिहासिक समझोता केला असून त्याची पूर्ण अंमलबजावणी केल्यानंतर इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखले जाईल. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने या कराराचा तपशील जाहीर केला असून इराणला त्यांचे संपृक्त युरेनियम तयार करणारी सेंट्रीफ्युजेस यंत्रे कमी करावी लागणार आहेत. त्याशिवाय इराण येथील अणुप्रकल्पाची फेररचना करावी लागणार आहे त्यामुळे त्यांना शस्त्रांसाठी लागणारे प्लुटोनियम तयार करता येणार नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीचा अंकुश राहणार असून ३.६७ टक्क्य़ांपेक्षा जास्त युरेनियम संपृक्त करणार नाही असे इराणने कबूल केले आहे. किमान १५ वर्षांत तरी त्यामुळे इराणला अणुबॉम्ब तयार करता येणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री जाविद झरीफ यांनी सांगितले की, हा समझोता आमच्यासाठी योग्यच आहे. आम्ही एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिपब्लिकन सदस्यांनी मात्र हा समझोता इराणचा अणुकार्यक्रम कितपत रोखू शकेल यावर शंका व्यक्त केली आहे.