पीटीआय, नवी दिल्ली
मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी लवकरच तपास सुरू करतील, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.एकाही दोषीला सोडले जाणार नाही, त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल अशी ग्वाहीही अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, ही चित्रफीत तयार करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
४ मे रोजी मणिपूरमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर कुकी समाजातील दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यांनी या प्रकरणाची चित्रफीत समोर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आणि विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. या पार्श्वभूमीवर या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मणिपूर दंगलीशी संबंधित अन्य पाच गंभीर गुन्ह्यांच्या तपास यापूर्वीच सीबीआयकडे देण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही चित्रफीत तयार करणाऱ्या संशयिताला बेडय़ा ठोकण्यात आल्या असून त्याच्याकडील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. यामुळे उजेडात आलेल्या चित्रफितीव्यतिरिक्त अन्य काही पुरावेदेखील हाती लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे तपास सुरू असताना मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. कुकी आणि मैतेई समुदायांना चर्चेसाठी समोरासमोर आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ जुलैनंतर राज्यात एकही हत्या झाली नसल्याचा दावाही सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
खटला राज्याबाहेर?
महिलांची धिंड काढल्याप्रकरणी खटला अन्य राज्यात, शक्यतो आसाममध्ये चालविला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.