रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवत आहे. सोमवारी युरोपने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्याचा इशारा दिलाय. तर अमेरिकने या वर्षाच्या शेवटापर्यंत रशियाकडून होणारी कच्चा तेलाची आयात पूर्णपणे बंद करणार असल्याचं म्हटलंय. यानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव ११८.११ डॉलर्सवरुन वाढून थेट १३९.१३ डॉलर्सपर्यंत पोहचलेय. ही वाढ तब्बल १७.८९ टक्क्यांची आहे. मागील १३ वर्ष ८ माहिन्यांमधील कच्च्या तेलाचा हा सर्वोत्तम भाव आहे.

नक्की वाचा >> Petrol-Diesel Prices: इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

२४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनदरम्यान संघर्ष सुरु झाला. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९६.८४ डॉलर्स इतकी होती. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर २ नोव्हेंबर २०२१ पासून वाढलेले नाहीत. मात्र १० तारखेनंतर म्हणजेच या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशात इंधन दरवाढीचा भडका उडेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. असं असतानाच आता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंधन दरवाढीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलंय.

नक्की वाचा >> Petrol-Diesel Prices: काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये बदल; पाहा ९ मार्च २०२२ रोजीचे इंधनाचे दर

“निवडणुकांमुळे आम्ही इंधनाचे दर वाढवले नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल,” असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना त्यांनी तेलाच्या किंमतीसंदर्भातील निर्णय तेल कंपन्या घेतात असंही ते म्हणाले. तेल कंपन्यांना स्पर्धेमध्ये टिकून रहायचं असल्याने त्यानुसारच त्यांच्याकडून तेलाची किंमत ठरवली जाते असंही त्यांनी म्हटलंय. “तेलाच्या किंमती या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतींनुसार ठरतात. जगातील एका भागामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे याचा तेल कंपन्या दरवाढ करताना नक्की विचार करतील. निर्णय घेताना ते सर्वसामान्य जनतेचा विचार करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

“निवडणुकांमुळे सरकारने तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवलं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासंदर्भात काळजी घेत आहोत,” असंही त्यांनी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी इंधन दरवाढीसंदर्भात भाष्य करताना कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने त्याचा परिणाम देशातील इंधनदरांवरही होणार आहे, असं सांगितलं. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू नये म्हणून सरकार वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याचे संकेतही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले.