Ola Employee Suicide Case: ओला इलेक्ट्रिक कंपनीतील ३८ वर्षीय कर्मचाऱ्याने कंपनीतील छळाला कंटाळून आत्महत्या केली. यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल आणि ओलाचे अधिकारी सुब्रत कुमार दास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर एफआयआर रद्द करावा, या मागणीसाठी ओला इलेक्ट्रिकने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान आज कर्नाटक उच्च न्यायालयात यासंबंधी सुनावणी झाली असताना विरोधी पक्षाच्या वकिलाने ओला ही ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वाईट कंपनी असल्याचे म्हटेल.
२८ सप्टेंबर रोजी ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलोगेशन इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या के. अरविंद (वय ३८) याने राहत्या घरात आत्महत्या केली. अरविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना एक सविस्तर सुसाइड नोट सापडली. ज्यामध्ये अरविंदने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी सतत छळ आणि दबाव आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी अरविंदचा मोठा भाऊ अश्विन कन्नन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
भाविश अग्रवाल यांची बाजू कोर्टात मांडणारे वकील एस. एस. श्यामसुंदर यांनी सांगितले की, सदर एफआयआर रद्द करण्यात यावा. आधी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद झाली होती. त्यानंतर एफआयआर बदलता येत नाही. त्यांनी पुढे म्हटले की, ओलाने सदर कर्मचाऱ्याचे सर्व थकबाकी चुकती केली आहे. तसेच या घटनेमुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कर्मचारी कंपनी सोडत आहेत, तर शेअर्सच्या किंमती खाली आल्या आहेत. तसेच तक्रारदार टीव्हीवर मुलाखती देत असल्यामुळे कंपनीची बदनामी होत आहे.
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याचे निर्देश दिले. मात्र याचिकाकर्त्यांचा छळ होणार नाही, याचीही काळजी घ्या, असेही न्यायालयाने सांगितले. यानंतर पुढील सुनावणीसाठी १७ नोव्हेंबरची तारीख दिली.
आत्महत्येचे प्रकरण काय?
के. अरविंद हा २०२२ पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये नोकरी करत होता. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी बेंगळुरूच्या चिक्कलसांद्रा येथील त्यांच्या घरी विष प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. घरात मिळालेल्या चिठ्ठीनंतर कुटुंबियांनी पोलिसांत एफआयआर नोंदविला. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी भाविश अग्रवाल यांच्यासह इतरांच्या नावाचाही समावेश केला.
बँक खात्यात १७ लाख आल्यानंतर संशय बळावला
एफआयआरमधील माहितीनुसार, अरविंदच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी त्याच्या बँक खात्यात एनइएफटीद्वारे १७ लाख ४६ हजार ३१३ रुपये जमा झाले. एवढ्या पैशांचा मेसेज आल्यानंतर अरविंदचा भाऊ अश्विनला संशय आला. अश्विनने म्हटले, “आम्ही याची सुब्रत कुमार दास यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी एचआरशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर ओला इलेक्ट्रिकचे प्रतिनिधी कृतेश देसाई, परमेश आणि रोशन घरी आले. त्यांनी पैशांच्या व्यवहाराची माहिती दिली. पण यातून कंपनी काहीतरी लपवत असल्याचा आम्हाला संशय आला.”
