‘रिओ ऑलिम्पिक २०१६’च्या विजेत्यांना देण्यात येणा-या पदकांची छायाचित्रे नुकतीच ऑलिम्पिक समितीतर्फे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या छायांचित्रांमध्ये सुवर्ण, रजत, कास्य आणि पॅरालिम्पिक पदकांचा समावेश आहे.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणा-या पदकांची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. कारण ही पदके बनवण्यासाठी जुने आरसे, एक्स-रे प्लेट्स आणि सोल्डरमध्ये वापरण्यात येणा-या तारेचा पुनर्वापर करण्यात आला असून त्यामध्ये ३० टक्के चांदीचा वापर करण्यात आला आहे. तर कास्य पदक बनविण्यासाठी टाकाऊ तांबे वापरण्यात आले आहे. पदकांना लावण्यात आलेल्या रिबीनी या प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळावर  याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक पदकावर पारंपारिक लॉरेल पानांची नक्षी असून त्यावर रिओ ऑलिम्पिकचे बोधचिन्ह कोरण्यात आले आहे. तर पदकाच्या दुस-या बाजूस यशाची देवता मानल्या जाणा-या ग्रीक देवतेची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. एकूण ५१३० पदकांची निर्मिती  ब्राझिलच्या टाकसाळीतर्फे करण्यात आली आहे.
ऑलिम्पिक अभ्यास केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी १९८६ पासून आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये देण्यात आलेली सुवर्ण पदकं ही पारंपारिक पद्धतीने चांदीचा मुलामा देऊन तयार केली गेली होती. लंडनमध्ये २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात आलेल्या सुवर्ण पदकांत केवळ १ टक्के सोने तर ९२.५ टक्के चांदी होती.
रिओ ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदके कशी तयार होतात त्याचा व्हिडिओ: