Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, याचा निषेध केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. राज्य विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेने केवळ पीडितांच्या कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण देशालाही धक्का बसला आहे. याचबरोबर त्यांनी, २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत, असे म्हटले आहे.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “या घटनेचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. आपण असे अनेक हल्ले यापूर्वी पाहिले आहेत. पहलगामच्या बैसरणमध्ये २१ वर्षांनंतर इतका मोठा हल्ला झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांची माफी कशी मागावी हे मला समजत नाही. यजमान असल्याने, पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे हे माझे कर्तव्य होते. मी ते मी पार पाडू शकलो नाही. माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत.”

मुख्यमंत्री अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे. लोक जेव्हा आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. ही त्याची सुरुवात आहे. आपण असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल. जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. आणि आता असे दिसते की लोक त्या टप्प्यावर पोहोचत आहेत.”

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला असल्याचे मानले जाते. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतेक पर्यटक होते.

दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तनास्थित संघटना असल्याचे समोर येतार केंद्र सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडण्याचे आदेश दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या चार दिवसांत अटारी सीमेवरून एकूण ५३७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. देशभरातील राज्य सरकारे आणि सुरक्षा संस्था याबाबत कारवाई करत आहेत. दुसरीकडे, १४ राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण ८५० भारतीय पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.