राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला!

राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे.

omicron variants Tracking centre states send all samples from covid hotspots
(Express photo by Amit Chakravarty)

जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं दोन दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केला होता. कर्नाटकमध्ये दोन करोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर गुजरात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे करोनाबाधित सापडले आहेत. त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला करोना रुग्ण आढळल्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांची देशातील संख्या आता पाचवर गेली आहे. टांझानियामधून आलेल्या प्रवाशांमध्ये हा रुग्ण आढळला असून गंभीर बाब म्हणजे भारतात आलेले एकूण १७ परदेशी प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सगळ्यांचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे किंवा नाही, याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकेल.

“दिल्लीत पहिला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो नुकताच टांझानियामधून परतला होता. आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या एकूण १७ लोकांची करोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

“Omicron मुळे जानेवारीत करोनाची तिसरी लाट येणार, पण…”; अभ्यासातून समोर आली दिलासादायक माहिती

ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेत आढळल्याचं WHO कडून जाहीर करण्यात आलं. २६ नोव्हेंबर रोजी त्याच्या B.1.1.529 या कोडऐवजी त्याला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण ३० देशांमध्ये आढळून आले आहेत. अजूनही त्याचा प्रसार होतच असून हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक वेगाने फैलाव होणारा असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

डोंबिवलीत आढळलेला हा ३३ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. त्याला ताप असल्याने चाचणी केली असता तो करोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून त्यामध्ये त्याला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे आढळले. या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत. सध्या तो डोंबिवली येथील करोना केंद्रामध्ये उपचार घेत आहे. त्याच्या अगदी जवळून संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या १२ जणांचा आणि कमी जोखमीच्या २३ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले.

ओमायक्रॉन अफ्रिकेत सापडण्याआधीच ‘या’ देशात पोहोचला होता; नव्या अभ्यासातून आले धक्कादायक निष्कर्ष!

या रुग्णाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्यातील त्याच्या २५ सहप्रवाशांचीही तपासणी करण्यात आली असून यापैकी कोणालाही करोना नसल्याचे आढळले. याव्यतिरिक्त त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेण्यात येत आहे. डोंबिवलीचा रहिवासी असलेला हा रुग्ण व्यापारी नौदलामध्ये अभियंता असून कामानिमित्ताने केपटाऊनला गेला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omicron variant corona patient found in delhi travel history from tanzania pmw

ताज्या बातम्या