महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी येऊन ते रामलल्लाचं दर्शन घेतलं. काही वेळापूर्वीच त्यांनी रामलल्लाची आरतीही केली. अशात अयोध्येतल्या मंदिरांचं बांधकाम पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक काळ असा होता की इथे यायचो मंदिर वही बनाएंगेचा नारा द्यायचो आज मंदिर तयार होतं आहे. हे पाहून समाधान वाटतं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“या मंदिर उभारणीचं साक्षीदार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कोट्यवधी राम भक्तांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी मोदीजींचे आभार मानेन. हे स्वप्न त्यांच्यामुळे पूर्ण होतं आहे. आम्ही नाराच दिला होता की मंदिर वहीं बनाएंगे. माझ्या नजरेसमोर तो सगळा काळ जातो आहे. सगळ्या कारसेवांमध्ये मी कारसेवक म्हणून आलो होतो. त्यावेळची अयोध्या आठवते आहे. बदायू जेलमध्ये १८ दिवस होतो तो काळही आठवतो आहे. तेव्हाही आमच्या मनात विश्वास होता की जो संघर्ष करतोय त्याला यश मिळेल. आपण हयात असताना हे व्हावं असं वाटायचं. त्याच्या खूप आधी हे मंदिर होतंय याचा विशेष आनंद आहे” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कारसेवेच्या वेळी आलो तेव्हा संघर्ष होता आज आनंद आहे
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी कारसेवक म्हणूनही इथे आलो होतो. त्या सगळ्या आठवणी झरझर माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. आज इथे येऊन मन भरून आलं आहे. तेव्हा नारा द्यायचो की मंदिर वहीं बनाएंगे. आज ते मंदिर इथेच तयार होतं आहे यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो? इथे काम पाहिल्यानंतर इंजिनिअर्स सांगत आहेत की जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या आधीच हे पूर्ण होईल.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?
लाखो करोडो रामभक्तांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. महाराष्ट्रही खारीचा वाटा उचलेल. महाराष्ट्रातलं आणलेलं लाकूड आम्ही मुख्य पुजाऱ्यांना दिली आहे. इथे आल्यानंतर आलेला अनुभव हा अवर्णनीय आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हनुमान गढीला जाऊन मारूतीरायाचं दर्शन घेतलं.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी रामदास कदम यांनीही आपल्या भावना बोलून दाखवल्या. आज हे मंदिर पाहायला मिळतं आहे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं. रामाचं दर्शन घेतल्याचं समाधान आम्हाला आहे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.