Telangana Protest against Agneepath Scheme केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनांना आता हिंसाचाराचे वळण लागले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नागरिकांनी तोडफोड करत रेल्वेंना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराचे लोट आता तेलंगणापर्यंत पोहचले आहेत. तेलंगणातील हैदराबादमध्येही नागरीकांनी अग्निपथ योजनेला विरोध करत रसत्यावर उतरत निदर्शने केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.

आंदोलकांनी रेल्वे डब्यांना लावली आग
आंदोलकांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकातील रेल्वच्या तीन डब्यांना आग लावली. हिंसाचार एवढा भडकला की, रेल्वे पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. मात्र, या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सिकंदराबाद स्टेशन आणि परिसरात तणाव
सिकंदराबाद रेल्वे स्थानक आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी रेल्वे स्थानकाजवळील दुकाने बंद करण्यात आली आहेत. आंदोलकांनी पार्सलच्या डब्यातून सामान बाहेर काढले, ते रुळांवर फेकले आणि त्यानंतर डब्यांना आग लावली. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी आंदोलन निवळोस्तर सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.