जयपूर येथे लष्कराच्या एका विभागाबरोबर काम करणाऱ्या पाकिस्तानच्या हेराला अटक करण्यात आली आहे. सदर गुप्तहेर हा अत्यंत महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेला पुरवित होता, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

वरिष्ठ लिपीक असलेल्या बी.के.सिन्हा याला पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली असून नेपाळमार्गे एका हस्तकामार्फत तो वर्गीकृत माहिती व कागदपत्रे आयएसआयला पुरवित होता. लष्कराच्या पुरवठा विभागात काम करणाऱ्या सिन्हा याची नेमणूक जयपूर येथे नैऋत्य कमांडमध्ये पुरवठा विभागात करण्यात आली होती. लष्करातील दुसऱ्या एका सहकाऱ्याच्या माध्यमातून तो नेपाळमधील हस्तकास भेटला व भारतीय लष्करातील महत्त्वाची माहिती देण्यासाठी तो वेळोवेळी काठमांडूला जात होता. राजस्थान पोलिसांच्या विशेष शाखेने सिन्हा याचे जाबजबाब घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.