‘अस्सी, नब्बे पूरे सौ’ असं म्हणत भारतात अखेर पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. करोनामुळे आधीच आर्थिक गणित बिघडलेलं असताना पेट्रोच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांचं कंबरडंच मोडलं आहे. त्यात आता पेट्रोलचे दर फक्त १००वरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण OPEC या कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवायला तूर्तास तरी स्पष्ट नकार दिला आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६५ डॉलर प्रति बॅरलच्याही वर गेल्या आहेत. त्या किंमती कच्च्या तेलाच्या कमी पुरवठ्यामुळे अजूनच वाढण्याची आता शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांना पेट्रोल दराच्या भडक्याची मानसिक तयारी करूनच ठेवावी लागणार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या OPEC चा संबंध काय?

OPEC (Organisation of Petroleum Exporting Countries) ही कच्च्या तेलाचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या देशांची संघटना आहे. जगभरात या संघटनेच्या माध्यमातून कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. याच कच्च्या तेलाचा वापर करून पेट्रोल इंधनाची निर्मिती केली जाते. या संघटनेमध्ये प्रामुख्याने आखाती देश आहेत. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, नायजेरिया, कुवैत, लिबिया, गबॉन, इराण, काँगो, व्हेनेझ्युएला, इराक, इक्वेडॉर, अल्जेरिया या देशांचा समावेश आहे. यासोबतच रशियामधून देखील काही प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.

सामान्यपणे जगाची कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी जवळपास १५ लाख बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाच्या उत्पादनाची आवश्यकता असते. मात्र, करोनाचा प्रभाव आणि जागतिक पातळीवरची आर्थिक स्थिती पाहाता ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं १० लाख बॅरल प्रतिदिन इतकंच उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रशिया आणि कझाकिस्तान यांना सूट देण्यात आली आहे. OPEC च्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये उत्पादन वाढवण्यावर एकमत होऊ शकलेलं नाही. आता पुढची बैठक १ एप्रिल रोजी होणार आहे. तेव्हा जर उत्पादन वाढलं, तरच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी असल्यामुळे त्यातून तयार होणाऱ्या पेट्रोलचा पुरवठा देखील कमी होत आहे. त्याचाच परिणाम अंतिमत: पेट्रोलच्या किंमती वाढण्यात होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opec not agree to increase crude oil production may increase petrol prices in india pmw
First published on: 05-03-2021 at 16:51 IST