डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये २२ वर्षीय तरुणानं अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती कोपनहेगन पोलिसांनी दिली आहे. हा हल्ला झाल्यानंतर अवघ्या ११ मिनिटांत पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोपनहेगनचे पोलीस निरीक्षक सोरेन थॉमसेन यांनी माध्यमांना सांगितले की, “हा दहशतवादी हल्ला असू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. हा हल्ला आरोपी तरुणाने एकट्याने केला आहे. पण पोलीस दहशवादी हल्ल्याची शक्यता तपासत आहेत. डेन्मार्कमध्ये गोळीबारासारख्या घटना घडणं तुलनेने दुर्मिळ आहे, असंही ते म्हणाले.

या गोळीबाराबाबत अधिक माहिती देताना थॉमसेन यांनी सांगितलं की, रविवारी दुपारी २२ वर्षीय डॅनिश तरुणाने स्कॅन्डिनेव्हियामधील एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार केला. या हल्ल्याच्या हेतूबाबत त्वरित अंदाज लावणं खूप घाईचं ठरू शकतं. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर काही लोक दुकानात लपले तर काहीजण घाबरलेल्या अवस्थेत चेंगराचेंगरी करत पळून गेले.

या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीसह दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतांबाबत अधिकचा तपशील अद्याप मिळू शकला नाही. तर या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. रविवारी सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ११ मिनिटांत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच नाव एथनिक डेन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हिंसाचाराबाबत दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.