Operation Akhal: भारतीय सैन्यदलाने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात दहशतवादाविरोधात सुरू केलेली मोहीम सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. रविवारी जंगल परिसरात अतिरेकी आणि सशस्त्र दलात उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या कारवाईत भारतीय सैन्यदलाच्या एका जवानाला गंभीर इजा झाल्याचीही माहिती मिळत आहे. चार ते पाच अतिरेक्यांचा गट या गावात असल्याचा सशस्त्र दलाचा संशय आहे.
तत्पूर्वी शनिवारी झालेल्या कारवाईत दोन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आल्याचे सैन्यदलाच्या वतीने सांगितले गेले होते. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ऑपरेशन अखलची ताजी माहिती देताना म्हटले की, शनिवारी रात्री अधूनमधून गोळीबार सुरू राहिला. सशस्त्र दलाने अतिरेक्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका अतिरेक्याला ठार केले.
शुक्रवारी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अखल येथील जंगलात सुरक्षा दलाने घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर अतिरेक्यांकडून गोळीबार करण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री दोन्ही बाजूंकडून गोळीबार थांबविण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी लष्कराची कुमक या परिसरात वाढविण्यात आली. त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. ज्यात दोन अतिरेकी ठार झाले. जंगलात लपून बसलेल्या अतिरेक्यांची शोधमोहीम हाती घेतल्यानंतर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला होता. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले, असे लष्करातील अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटेल.