नोटाबंदीनंतर ऑपरेशन क्लिन मनी मोहिम

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने ऑपरेशन क्लिन मनी मोहिमेअंतर्गत १ कोटी खात्यांची तपासणी केली असून १८ लाख लोकांना त्यांच्या पैशाचा स्रोत विचारणारे एसएमएस किंवा इमेल जारी केले आहेत. प्राप्तिकर विभागाने यात माहितीचे विश्लेषण केले असून १ कोटी बँक खात्यांचा त्यात समावेश आहे. खातेदाराची पूर्वीची करविवरणपत्रे व इतर  कागदपत्रे यांचा अंदाज घेऊन त्यांच्याकडे जर अचानक मोठा निधी जमा दाखवला असेल तर त्यावर एसएमएस व इमेल जारी करण्यात आले आहेत. एकूण ३.६५ कोटी लोक प्राप्तिकर विवरण पत्रे भरतात. त्यात ७ लाख कंपन्या व ९.४० लाख अविभक्त हिंदू कुटुंबे तर ९.१८ लाख आस्थापने आहेत, ही आकडेवारी २०१४-१५ या वर्षांतील आहे. एकूण २५ कोटी जनधन खाती आर्थिक सर्वसमावेशकता मोहिमेत उघडण्यात आली होती. प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाने सर्व खात्यांची वर्गवारी करून छाननी केली असून आणखी एसएमएस  व इमेल पाठवले जाणार आहेत. किमान १८ लाख लोकांच्या नावावर पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम दाखवली गेली असून लोकांची छळवणूक होऊ नये यासाठी सरकारने सह आयुक्त  दर्जाचे अधिकारी नोटिसा पाठवण्यासाठी ठेवले आहेत. ऑपरेशन क्लिन मनी मोहीम प्राप्तिकर खात्याने ३१ जानेवारीला राबवली होती. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पाच लाख व त्यापुढील रकमा ठेवणाऱ्या खातेदारांची संख्या १८ लाख आहे. जर प्राप्तिकर खात्याला करदात्याचे उत्तर योग्य वाटले तर प्रकरण बंद केले जाईल व त्याबाबतचा एसएमएस व इमेल पाठवला जाईल. जर उत्तर योग्य वाटले नाही तर सहायक आयुक्त किंवा आयुक्त आणखी स्पष्टीकरणासाठी नोटीस पाठवतील.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.