Operation Sindoor Press Conference: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने आज ऑपरेशन सूंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ हवाई हल्ले करून उद्ध्वस्त केले. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची पार्श्वभूमी आहे. अशात आज नवी दिल्लीत ऑपरेशन सिंदूरबाबत झालेल्या पत्रकार परिषदेचे नेतृत्त्व महला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केले. यानंतर या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी कर्नल कुरेशी आणि आयएएफ विंग कमांडर सिंग यांचे पत्रकार परिषदेसाठी कौतुक केले. “भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर दोन वेगवेगळ्या धर्मांच्या दोन महिला अधिकारी देशाला संबोधित करण्यासाठी एकत्र येत आहेत. हीच एकता दहशतवाद्यांना तोडायची होती. मात्र, त्यांनी आपल्याला आणखी भक्कमपणे एकत्र आणले. भारतीय सशस्त्र दलांनी किती उत्तम संदेश दिला आहे, हे एक परिपूर्ण चित्र आहे”, असे एका युजरने म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनीही भारतीय लष्करातील स्त्रीशक्तीची ताकदीवर भाष्य केले आहे. एका एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. हा क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे. तिन्ही संरक्षण दलांत महिलांना सक्षम संधी देणारा १९९१ मध्ये घेतला गेलेला ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा म्हणावा लागेल!”

कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत?

कर्नल सोफिया कुरेशी यांची लष्करी पार्श्वभूमी उत्कृष्ट आहे. त्यांचे आजोबाही भारतीय सैन्यात होते. त्यांचे लग्न सैन्यातीलच एका अधिकाऱ्याशी झाले आहे. गुजरातमध्ये जन्मलेल्या सोफिया यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. १९९९ मध्ये, त्यांना चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये लेफ्टनंट म्हणून तैनात करण्यात आले होते.

२०१६ मध्ये, त्यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून इतिहास रचला. २००६ मध्ये, सोफिया यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत काम केले. “या मोहिमांमध्ये, आम्ही त्या देशांमध्ये युद्धबंदीचे निरीक्षण करतो आणि मानवतावादी कार्यात देखील मदत करतो. संघर्षग्रस्त भागात शांतता निश्चित करणे हे काम आहे”, असे सोफिया यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला सांगितले होते.

विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत?

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले असून, त्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्येही सहभागी होत्या. त्यांनी काही कठीण परिस्थितीत चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर चालवले आहेत. २०१९ मध्ये, त्यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून तैनात करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. २०२० मध्ये, त्यांनी अरुणाचल प्रदेशातील एका प्रमुख मोहिमेचे नेतृत्व केले, जे कठीण हवामानात आणि उंचावर पार पाडण्यात आले होते.