Operation Sindoor Success: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. याच ऑपरेशन सिंदूरच्या यशाने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात किमान १७ नवजात बालकांचे नाव ‘सिंदूर’ ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान ९ आणि १० मे रोजी यातील बहुतेक नवजात बालकांचा जन्म झाला.
“कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये १० आणि ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींचे नाव त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर ठेवले आहे,” असे प्राचार्य डॉ. आर.के. शाही यांनी पीटीआयला सांगितले.
सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ…
“आपल्या शूर जवानांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याच्या दोन दिवसांनी, ९ मे रोजी माझ्या बाळाचा जन्म झाला. आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांचे मी आभार मानू इच्छिते. सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ मी माझ्या मुलीचे नाव ‘सिंदूर’ ठेवले आहे”, असे नेहा गुप्ता यांनी सांगितले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
सिंदूर आता धैर्याचे प्रतिक
“माझ्या बाळाच्या जन्मापूर्वीच, मी ठरवले होते की, त्याचे किंवा तिचे नाव सिंदूर असेल. कारण ते आता धैर्याचे प्रतीक बनले आहे”, असे भेदिहारी गावातील अर्चना यांनी सांगितले. त्यांचे पती अजित म्हणाले की, “हे नाव राष्ट्रीय अभिमान पुन्हा निर्माण करणाऱ्या जवानांचा सन्मान आहे. सैनिकांमुळेच आपण येथे सुरक्षित आहोत, त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी आपण कमीत कमी हे तर करू शकतो.”
दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. जे भारतीय लष्कराने परतावून लावले. इतकेच नव्हे तर भारताने प्रत्युतरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर पाकिस्तानने नमते घेत भारताबरोबर शस्त्रविराम केला आहे.
ऑपरेशन सिंदूरपूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकाने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली होती. याचाच भाग म्हणून भारताने सिंधू जल करार तत्काळ स्थगित करून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते.