वृत्तसंस्था

नवी दिल्ली/मुंबई : पहलगाममधील हल्ल्याचा सूड उगवत भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने देशातील वातावरण भारले असताना, या देशाभिमानाच्या लाटेचे ‘व्यावसायीकरण’ करण्याचे बेतही रचले जाऊ लागले आहेत. सैन्यदलाच्या शौर्य, धाडस आणि अचूकतेचे प्रतीक असलेल्या या मोहिमेचे नाव ‘व्यापारचिन्ह’ म्हणून मिळवण्यासाठी चक्क स्पर्धा लागली आहे. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या नावासाठी गेल्या दोन दिवसांत चित्रपट निर्मात्यांच्या संस्थेकडेही ३० हून अधिक अर्ज आले आहेत.

पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांच्या संतापाचे प्रतीक म्हणून या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ ठेवण्यात आले. त्यामुळे सैन्यदलाच्या कारवाईइतकीच चर्चा या नावाचीही होत आहे. त्यामुळेच या नावाचे ‘व्यापारहक्क’ मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ नावाने भविष्यात या मोहिमेवर आधारित चित्रपट वा वेबमालिका करता येईल हा विचार या स्पर्धेमागे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा नेहमीच चित्रपटकर्त्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आवडीचा विषय राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही देशांतील युद्ध, तणाव, संघर्ष आणि संबंधांवर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असून ते लोकप्रियही ठरले. २०१६मधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’वर आधारित चित्रपट तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यामुळेच आता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चित्रपटाचे बेत आखले जाऊ लागले आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते झाल्याची माहिती भारत सरकारकडून दिल्याला सहा-सात तास उलटतात न उलटतात तोच बुधवारी (७ मे) सकाळी १०.४२ वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने वाणिज्य आणि उद्याोग मंत्रालयाच्या ‘भारतीय बौद्धिक संपदा’विषयक संकेतस्थळावर ‘ऑपरेशन सिंदूर’चे ‘व्यापारचिन्ह’ (ट्रेडमार्क) मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. पाठोपाठ गेल्या २४ तासांत आणखी पाच अर्ज या नावाच्या ‘हक्का’साठी दाखल करण्यात आले.

‘रिलायन्स’खेरीज या अर्जदारांमध्ये अन्य मोठे नाव नाही. त्यामुळेच संकेतस्थळावर उपलब्ध अर्जांची माहिती एका वापरकर्त्याने समाजमाध्यमांवरून प्रसारित करताच या व्यापारवृत्तीवर टीकेची झोड उठू लागली. त्यामुळे रिलायन्सने गुरुवारी सायंकाळी तातडीने आपला अर्ज मागे घेतला. ‘‘रिलायन्स उद्याोग समूहाच्या मालकीच्या ‘जिओ स्टुडिओज’च्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने चुकून अर्ज केला’’ अशी सारवासारव कंपनीने केली. तसेच ‘‘ऑपरेशन सिंदू हे आता भारतीय शौर्याचे प्रतीक आहे’’ असे सांगत या प्रकरणापासून नामानिराळे होण्याचा प्रयत्नही केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपट निर्मात्यांच्याही उड्या

‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन प्रोड्युसर्स कौन्सिल आणि वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन या संस्थांकडे ‘सिंदूर’ या नावाशी संबंधित चित्रपटांच्या नावासाठी ३० हून अधिक अर्ज आले आहेत. त्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’,‘मिशन सिंदूर’, ‘सिंदूर: द रिव्हेंज’, ‘हिंदूस्थान का सिंदूर’ अशा स्वरुपाची नावे आल्याचे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय ‘पहलगाम: द टेरर अटॅक’ सारख्या नावांचाही यात समावेश आहे.