मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनानंतर रशियन सत्ताकेंद्रात मोठा आणि थेट संघर्ष सुरू झाला आहे. युक्रेनवरील आक्रमण अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असताना रशियातच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

पुतिन यांनी रशियातील ताज्या अंतर्गत संघर्षांची तुलना रशियात १९१७ मध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीशी केली आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान झार निकोलस द्वितीयची सत्ता बोल्शेविक क्रांतिकारकांनी उलथवली होती. त्यानंतर रशियात गृहयुद्ध-यादवी सुरू झाली होती. या संघर्षांची परिणती सोव्हिएत संघनिर्मितीत झाली होती.

पुतिन म्हणाले, की पहिल्या जागतिक महायुद्धात रशिया सहभागी असताना १९१७ मध्ये रशियाला जो देशांतर्गत धक्का बसला होता, तसाच धक्का आता बसला आहे. मात्र, त्यामुळे त्या वेळी रशियाला विजयापासून वंचित राहावे लागले. कारस्थान, भांडणे, वाद, लष्कर आणि जनतेपासून लपवून केलेल्या छुप्या-गुप्त राजकारणामुळे लष्कराचेच मोठे नुकसान झाले. रशियन राज्ययंत्रणेचा ऱ्हास झाला. रशियाला मोठा प्रदेश गमवावा लागला. परिणामी अंतर्गत यादवी होऊन रशियन जनतेला मोठय़ा शोकांतिकेस तोंड द्यावे लागले. रशियन बांधवांनी आपल्या रशियन बांधवांची हत्या केली.

‘सीआयए’चे माजी अधिकारी आणि सध्या ‘सीएनएन’शी संबंधित स्टीव्ह हॉल यांनी सांगितले, की प्रिगोझिन यांनी हे पाऊल उचलून स्वत:ला असुरक्षित केले आहे. आपण काय करतो आहोत, आपल्याला कशाला सामोरे जावे लागेल, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. यात खूप मोठा धोका असूनही त्यांनी हे पाऊल उचलले, याचा अर्थ त्यांनी  यात यशस्वी होऊ या संदर्भात काही आडाखे बांधले असावेत.

दरम्यान, रशियातील या घडामोडींचे युक्रेनमध्ये प्रचंड स्वागत करण्यात आले. ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिटय़ूट’चे वरिष्ठ विश्लेषक माल्कम डेव्हिस यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, की युक्रेन आता रशियात निर्माण झालेल्या या अस्थिरतेचा लाभ उठवण्यास उत्सुक असेल. विशेषत: रशियाला आघाडीवरील लष्कर हटवण्यास भाग पाडण्यासाठी युक्रेन प्रयत्न करेल. मात्र  रशियन लष्कर कोणती व्यूहात्मक पावले उचलते, हे बारकाईने पाहून मगच त्यांना पुढील कृती करावी लागेल.

काय होऊ शकते?

‘वॅग्नेर’ने केलेल्या या बंडखोरीला जर गृहयुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले तर ‘वॅग्नेर’शी लढण्यासाठी आणि हे बंड मोडीत काढण्यासाठी युक्रेनमधील आघाडीवर तैनात रशियन लष्कराची पथके कमी करून, माघारी नेली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रशियाच्या आघाडीतील विस्कळीतपणाचा लाभ उठवत युक्रेनियन सैनिक संधी साधतील. युक्रेनचे सैन्य आक्रमक होऊन रशियन अमलाखालील आपला प्रदेश पुन्हा बळकावेल. रशियन आघाडीतील फटी-कच्चे दुवे युक्रेन शोधत राहील आणि त्याद्वारे रशियन सैन्याची हानी करत, त्यांना माघार घ्यायला लावून युक्रेन आपला प्रदेश पुन्हा मिळवेल,  अशी शक्यता आहे.

जर्मनीचे बारकाईने लक्ष :

‘‘जर्मन चान्सलर यांना रशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली जात आहे. रशियात वेगवान घडामोडी घडत आहेत म्हणून आम्ही त्याचे सातत्याने बारकाईने निरीक्षण करीत आहोत आणि आमच्या निकटवर्तीयांशी समन्वय साधत आहोत.’’

जर्मन सरकारचे प्रवक्ते

रशियात अस्थैर्य

‘‘पंतप्रधान मेलोनी रशियामधील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे रशियात देशांतर्गत अस्थैर्य निर्माण होत असल्याचे दिसत आहे.’’ – इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे कार्यालय

बंडाची बीजे कशात?

नवी दिल्ली : रशियाच्या वतीने युक्रेनमध्ये लढणाऱ्या खासगी वॅगनर समूहाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन अनेक महिन्यांपासून संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि रशियाचे सर्वोच्च लष्करप्रमुख जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर टीका करत होते. हे दोघेही अकार्यक्षम असून आपले पाय खेचत असल्याचा प्रिगोझिन यांचा आरोप होता. अलिकडे याबाबत त्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. ‘वॅगनर’चे सैनिक जिथे तैनात आहे व त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी रशियन लष्कराने भूसुरूंग पेरल्याचा गंभीर आरोप प्रिगोझिन यांनी केला. तसेच त्याच्या पुराव्यादाखल ‘वॅगनर’ने एका रशियन अधिकऱ्याची चित्रफीतही प्रसृत केली होती. त्यात या अधिकाऱ्याला मारल्याचे जाणवत होते. आपण मद्याच्या नशेत असताना ‘वॅगनर’च्या लष्करी वाहनावर गोळीबार केल्याची कबुली देताना तो दिसत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेल्गोरोदमधील युक्रेन सशस्त्र दलांच्या घुसखोरीमुळे प्रिगोझिन संतप्त झाले आहेत. ‘‘आमचे हजारो रशियन पश्चिमेकडे आगेकूच करताना का मरत आहेत? बेल्गोरोदच्या रुपाने आपल्या मूळ रशियन भूमीच्या तुकडे आपण टप्प्या-टप्प्याने गमावणार आहोत का? या रशियन नागरिकांच्या मृत्यूबद्दल सर्वजण मौन का बाळगत आहेत? आम्ही आमचे प्रदेश आणि नागरिकांना शत्रूकडे गिळंकृत करण्यासाठी सोपवत आहोत का, याबाबत संबंधित खुलासा का करत नाहीत?,’’ असे संतप्त सवाल प्रिगोझिन यांनी केले आहेत. काहींचा असा कयास आहे, की प्रिगोझिन युक्रेनच्या आक्रमणात प्रदेश गमवावा लागल्याने उच्चपदस्थांवर टीका करत आहेत. लष्करप्रमुखांना दोष देऊन ते पुतिन यांच्या अपयशासंदर्भातील लक्ष अन्यत्र वेधत आहेत.