रामदेव बाबांच्या चॅनलला नेपाळमध्ये विरोध, सरकारचा कारवाईचा इशारा, कारण काय? वाचा…

रामदेव बाबांच्या याच दोन चॅनलला नेपाळमध्ये विरोध होत आहे. सरकारने या चॅनलवर कारवाईचा इशाराही दिलाय.

रामदेव बाबा (संग्रहित छायाचित्र)

योग गुरू रामदेव बाबा आणि त्यांचे निकटवर्तीय आचार्य बालकृष्ण यांनी नेपाळमध्ये शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) आस्था नेपाळ आणि पतंजली नेपाळ हे दोन चॅनल्स लाँच केले. विशेष म्हणजे नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी सेंटर) अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. मात्र, आता रामदेव बाबांच्या याच दोन चॅनलला नेपाळमध्ये विरोध होत आहे. सरकारने या चॅनलवर कारवाईचा इशाराही दिलाय.

“विना परवानगी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करताच टीव्ही चॅनलचं प्रसारण झालं तर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं रविवारी (२१ नोव्हेंबर) दिला. नेपाळचे माहिती आणि प्रसारण विभागाचे महानिर्देशक गोगन बहादूर हमल यांनी रामदेव बाबांच्या दोन्ही चॅनलने नोंदणीसाठी अर्जच केला नसल्याचं म्हटलं आहे.

“नेपाळमध्ये टीव्ही चॅनलचं प्रसारण केल्यास कारवाई करू”

हमल म्हणाले, “रामदेव बाबा यांनी चॅनल सुरू करण्यासाठी आवश्यक कोणत्याही प्रक्रियेचं पालन केलेलं नाही. नेपाळ पतंजलीने जारी केलेल्या निवेदनावर विश्वास ठेवता येणार नाही. आम्ही या प्रकरणाचं सत्य समोर आणण्यासाठी तपास समितीचं गठण केलंय. त्यांनी आमच्या परवानगीशिवाय आणि आवश्यक प्रक्रियेशिवाय नेपाळमध्ये टीव्ही चॅनलचं प्रसारण केल्यास आम्ही आवश्यक कारवाई करू.”

पतंजली योगपीठाची भूमिका काय?

दुसरीकडे पतंजली योगपीठाने म्हटलं, “कंपनी नोंदणी कार्यालयाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय इतर आवश्यक मंजुरींची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.”

“नेपाळमध्ये माध्यमांमध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी नाही”

नेपाळच्या स्थानिक पत्रकारांच्या संघटनांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेपाळमध्ये मीडियात परदेशी गुंतवणुकीला परवानगी नाही. त्यांनी रामदेव बाबा यांच्या दोन्ही चॅनलचं लाँचिक कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Opposition to tv channels of ramdev baba in nepal know why pbs

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या