PM Modi Nashik Visit Updates आजचा हा दिवस भारतातल्या युवा शक्तीचा दिवस आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आज नाशिकमध्ये आहे. मी आज युवाशक्तीला अभिवादन करतो. आज जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती. राजमाता जिजाऊ यांना मी कोटी कोटी वंदन करतो. महाराष्ट्राची भूमी ही पुण्यभूमी, वीरभूमी आणि तपोभूमी आहे. या जमिनीवर राजमाता जिजाऊंसारख्या मातृशक्तीने छत्रपती शिवरायांसारख्या महाशक्तीला घडवलं. याच महाराष्ट्रातून अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर अशी थोर रत्नं याच मातीत जन्माला आली. वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं. आपला देश लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांचा सहभाग जितका मोठा तेवढीच ती विकसित होईल असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामचंद्रांनी बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. मी आवाहन केलं होतं की २२ जानेवारी पर्यंत देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवू. आज मी मंदिरात आलो तेव्हा मला दर्शनाचं आणि स्वच्छता करण्याचं भाग्य लाभलं आहे. आज मी पुन्हा आवाहन करतो की राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातली सगळी मंदिरं स्वच्छ करावीत. प्रत्येकाने श्रमदान करावं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारतातील युवकांचं चरित्र, त्यांची बुद्धी यावर भारताची वाटचाल ठरणार आहे. स्वामी विवेकानंदांनी केलेलं मार्गदर्शन हे आजच्या युवाशक्तीसाठी खूप मोठी प्रेरणा. आज भारत जगातल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आला आहे. यामागे भारतीय युवकांचं योगदान आणि शक्ती आहे. भारत आज निर्मिती, उत्पादनाचं क्षेत्र होतो आहे याचा आधार भारतातली युवाशक्ती आहे.

काळ प्रत्येकाला एक सोनेरी क्षण देत असतो. भारताच्या इतिहासातला हा अमृत काळ आहे. युवाशक्तीकडे इतिहास घडवण्याचा सुवर्णक्षण आहे. आजही आपण भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांच्यासारख्या अगणित क्रांतिवीरांची आठवण करतो. त्यांनी आपल्या प्रयत्नांतून इंग्रजांविरोधात लढा दिला होता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हे सामाजिक सुधारणेसाठी घेतलं पाहिजे याचं महत्व सांगितलं. हे असे लोक होते जे देशासाठीच जगले. या सगळ्यांनीच देशाला नवी दिशा दिली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आता नव्या पिढीकडे अमृतकाळात भारत नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. पुढच्या शतकात त्या वेळची पिढी तुमची आठवण काढेल असं काम करा. तुमचं नाव भारत आणि जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असं काम करा. मला ठाऊक आहे तुम्ही हे करु शकता. भारताची युवशक्ती ही लक्ष्यभेद करु शकते. माझा सर्वाधिक विश्वास याच तरुणाईवर आहे.

आपल्या सरकारला दहा वर्षे होत आहेत. या दहा वर्षात तरुणाईला आस्मान खुलं केलं आहे. शिक्षण, रोजगार, आंत्रप्रेनर शिप, स्टार्ट-अप देशातल्या युवकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इको सिस्टिम तयार करतो आहोत. २१ व्या शतकातलं आधुनिक शिक्षण देण्यासाठी नवं शिक्षण धोरण लागू केलं गेलं आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.