पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज परिवर्तन यात्रेचे आयोजन केलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा सहभागी झाले आहे. अमित शाह यांनी या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये भाषण देताना आम्हाला सोनार बंगला घडवण्यासाठी राज्यात सत्ता हवी आहे असं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे, असंही शाह यांनी म्हटलं आहे. ते आज २४ परगना येथील काकद्विप येथील सभेमध्ये बोलत होते.

ममता बॅनर्जी यांचं सरकार पाडायचं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधरवणे, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधरवणे याला आमचं प्राधान्य असणार आहे, असंही शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

पुढे बोलताना हे सत्तांतर केवळ राजकीय नसेल तर गंगासागरमधील जनतेला सन्मान मिळवून देण्यासाठी असेल. या परिसरातील मासेमारी करणाऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी असेल. राज्यात ममता बॅनर्जी यांचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?, ममता सत्तेत असताना बंगाल विकासाच्या मार्गावर चालेल का?, असे प्रश्नही अमित शाह यांनी आपल्या भाषणामधून उपस्थित करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला.

भाजपा सत्तेत आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आम्ही महिलांसाठी ३३ टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ असं आश्वासनही शाह यांनी दिलं.

भाजपाने सुरु केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असून राज्यात भाजपा विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये थेट स्पर्धा रंगणार आहे.