Over 100 Pakistani soldiers killed in Operation Sindoor says Lt Gen Rajiv Ghai : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केली. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान या ऑपरेशनबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात करण्यात आलेल्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दहशतवादी तळांना लक्ष्य करताना १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले, अशी माहिती डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्टॅटर्जी) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी मंगळवारी दिली आहे.

तीन दिवसांच्या या कारवाईदरम्यान लष्करी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल (DGMO) म्हणून कार्यरत राहिलेले लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, त्यांच्या सैन्याने जाहीर केलेल्या नेहमीपेक्षा जास्त मरणोत्तर पुरस्कारांच्या संख्येवरून पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा अंदाज लावला जाऊ शकतो, ते यूएन ट्रूप कॉट्रिब्युटिंग नेशन्सच्या लष्करप्रमुखांच्या परिषदेत बोलत होते.

या लष्कराच्या मोहिमेबद्ल आत्तापर्यंत समोर आलेली सर्वात सविस्तर माहिती देताना लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, दोन्ही डीजीएमओमध्ये संवाद होऊन देखील पाकिस्तानी ड्रोनकडून भारतीय हवाई हद्दीचे वारंवार उल्लंघन झाल्यामुळे, भारतीय हवाई दलाने (IAF) ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांवर अचूक हल्ले केले.

“आम्ही त्यांच्या ११ हवाई तळांना लक्ष्य केले. ८ एअर बेसेस, तीन हँगर्स आणि चार रडारांचे नुकसान झाले. पाकिस्तानी एअर असेट्स जमिनीवर नष्ट करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. “एक सी-१३० विमान, एक AEW&C, आणि चार ते पाच फायटर जेट्स हवेत नष्ट करण्यात आले,” असेही घई यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी देखील या हवाई हल्ल्यांमध्ये सी-१३० ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि पाकिस्तानी हँगरमध्ये उभी करण्यात आलेली, बहुतेक एफ-१६ प्रकारची चार ते पाच लढाऊ विमानांचे नुकसानग्रस्त झाल्याची पुष्टी केली होती. तसेच, एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) किंवा सिग्नल्स इंटेलिजन्स (SIGINT) एअरक्राफ्ट नष्ट करण्यात आले. याबरोबरच एफ-१६ आणि जेएफ-१७ क्लासची अनेक प्रगत लढाऊ विमाने नष्ट झाली होती, असेही त्यांनी सांगितले होते.

“अरबी समुद्रात भारतीय नौदलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. “जर शत्रूने हे वाढवण्याचा निर्णय घेतला असता, तर फक्त समुद्रातूनच नव्हे, तर त्यांच्यासाठी ते इतरही बाजूंनी विनाशकारी ठरले असते,” असे घई म्हणाले.” ऑपरेशन सिंदूरमध्ये ७ मे रोजी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असेही घई म्हणाले.